शिल्पा शेट्टी, राज कुंद्रावर ६०.४८ कोटींच्या फसवणुकीचा आरोप
मुंबई : खरा पंचनामा
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिचे पती व व्यावसायिक राज कुंद्रा आणि एका अज्ञात व्यक्तीवर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) ६०.४८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.
ही फसवणूक त्यांच्या आता बंद पडलेल्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित कर्ज-सह-गुंतवणूक करारातून झाल्याचे सांगण्यात आले आहे. जुहू पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेतील फसवणूक आणि बनावटगिरीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.
ही तक्रार जुहूचे रहिवासी व लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस (एनबीएफसी) चे संचालक दीपक कोठारी (६०) यांनी त्यांच्या वकिलांमार्फत दाखल केली. कोठारी यांनी सांगितले की, राजेश आर्य नावाच्या व्यक्तीमार्फत त्यांची ओळख शेट्टी-कुंद्रा दाम्पत्याशी झाली. तेव्हा दोघांकडे कंपनीतील ८७.६ टक्के शेअर्स होते. आरोपींनी सुरुवातीला १२ टक्के व्याजदराने ७५ कोटी रुपयांचे कर्ज मागितले, परंतु नंतर अधिक कर टाळण्यासाठी "गुंतवणूक" स्वरूपात पैसे देण्यास भाग पाडले, असे कोठारी यांचा आरोप आहे.
कोठारी यांनी एप्रिल २०१५ मध्ये ३१.९५ कोटी रुपये आणि सप्टेंबर २०१५ मध्ये आणखी २८.५३ कोटी रुपये हस्तांतरित केले. एप्रिल २०१६ मध्ये शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांनी वैयक्तिक हमी दिली होती, मात्र सप्टेंबर २०१६ मध्ये त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला. नंतर २०१७ मध्ये कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू असल्याचे कोठारी यांच्या लक्षात आले. वारंवार प्रयत्न करूनही पैसे परत मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेट्टी-कुंद्रा यांचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले, "हे प्रकरण पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचे असून ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी एनसीएलटी मुंबईने यावर निर्णय दिला आहे. यात कोणताही गुन्हेगारी संबंध नाही. आमच्या ऑडिटर्सनी EOW ला सर्व आवश्यक कागदपत्रे आणि तपशीलवार रोख प्रवाह विवरणपत्रे सादर केली आहेत."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.