"प्रतिगामी शक्तींची देश आणि राज्य चालविण्यात घुसखोरी"
मुंबईत 'जनसुरक्षा' विरोधी संघर्ष समितीकडून निर्धार परिषद
मुंबई : खरा पंचनामा
'देशाचे चित्र गंभीर असून लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर संकट, त्यांच्यावर हल्ला या गोष्टी दैनंदिन झाल्या आहेत. पुरोगामी विचारांच्या नेत्यांना खोट्या कारणांनी अटक करून तुरुंगात टाकले जात असून प्रतिगामी शक्तींची देश आणि राज्य चालविण्यात घुसखोरी सुरू आहे,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
यशवंतराव चव्हाण केंद्र येथे जनसुरक्षा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शरद पवार यांनी देश आणि राज्य चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रतिगामी शक्तींचा सुरू असलेला घुसखोरपणा हा शासनापुरता मर्यादित राहिलेला नाही तर न्यायसंस्थेवरसुद्धा एक प्रकारचा हल्ला होतोय. भाजपच्या प्रवक्तेपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला न्यायदानाचा अधिकार दिला जात असल्याचे पाहण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस आणि सातत्याने हे घडतेय. जो कोणी पुरोगामी विचार मांडतो, त्यांच्यावर मात्र हल्ला केला जातो, अशी टीका त्यांनी केली.
'जनसुरक्षा कायद्याला विधिमंडळात मंजुरी देण्यात आली. हे होत असताना विधिमंडळामध्ये त्याला पाहिजे तेवढ्या प्रभावीपणे विरोध करण्यात आला नाही,' असेही पवार यांनी मान्य केले. 'विधान परिषदेत काही दुरुस्त्या केल्या गेल्या.
हा कायदा तुमचा विचार, मुलभूत अधिकार, याच्यावरही गदा आणणार आहे, त्यामुळे जे काही विधिमंडळामध्ये घडले असेल, पण निदान राज्याच्या कानकाकोपऱ्यामध्ये जाऊन जनतेला यासंबंधित जागरूक करून या टोकाच्या प्रतिगामी शक्तींना संघर्ष करून दूर ठेवण्याची काळजी घ्यावी लागेल,' असे पवार म्हणाले.
या परिषदेला खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल देसाई, अजित नवले, भारत पाटणकर, प्रकाश रेड्डी, उल्का महाजन, भालचंद्र कांगो, उदय भट, प्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते.
"दहशतवाद किंवा देशद्रोहीविरोधी कायदा आणताना जात, पात, धर्म पाहू नका. जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोह हाच धर्म समजून त्याला फासावर लटकवा, आम्ही त्यासाठी पाठिंबा देतो. मात्र, जनसुरक्षा कायद्यात त्याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सरकारने आणलेला कायदा रद्द करण्यासाठी तीव्र लढा देऊ," असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ते म्हणाले, की उद्धव ठाकरे डाव्यांच्या व्यासपीठावर कसे, असा प्रश्न उपस्थित केला जातो. कम्युनिस्ट आणि शिवसेनेचा एकेकाळी संघर्ष झाला होता. पण राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष, सूड असता कामा नये, असे स्पष्ट करत मी, शरद पवार, काँग्रेस, कम्युनिस्ट असे एकत्र का येऊ शकलो, कारण आमच्या सर्वांच्या मनात देशप्रेमाचा एक समान धागा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जनसुरक्षा' नावाने आणलेला कायदा हा लोकशाही असुरक्षा कायदा आहे. फडणवीस यांना दिल्लीत पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडू लागले आहे आणि गोळवलकर यांच्या विचारसरणीतील भारत करण्यासाठी फडणवीस यांच्याकडून हा सर्व खटाटोप करण्यात आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते म्हणाले, की डावे-उजवे असा वाद लोकशाहीसाठी चांगला असला तरी याविरोधात एकत्र येऊन लढले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.