दिवाळीनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती
नाशिक : खरा पंचनामा
"राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होईल. या निवडणुका विविध टप्प्यांत होणार असून जानेवारीच्या मध्यापर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होईल," अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालामुळे नवीन प्रभागरचनेनुसार निवडणुका होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त वाघमारे यांनी निवडणुकांच्या तयारीबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्य आयोगाने निवडणूक आयाागाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
राज्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग तसेच गट-गणाची रचना करण्याचा कार्यक्रम सरू आहे. ही प्रक्रिया राबविताना न्यायालयाने सोमवारी (ता. ४) ओबीसी आरक्षणाबद्दल दिलेल्या आदेशानुसार प्रकिया पूर्ण केली जाईल. प्रभाग व गट-गणांच्या रचनेवेळी ओबीसी आरक्षणाची पद्धत ही रोटेशन पद्धतीने अवलंबण्यात येणार असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
"राज्यात दिवाळीनंतर साधारणतः निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. पण, मनुष्यबळ व मतदानासाठी साहित्याची उपलब्धता मर्यादित असल्याने निवडणुका टप्याटप्यांत घेण्यात येतील," असे वाघमारे यांनी सांगितले. मात्र, पहिल्या टप्यात जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार की महापालिका-नगरपालिकांच्या निवडणुका होणार याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका केंद्रावर साधारणतः ९०० मतदार असतील. मतदार याद्यांचे विभाजन करताना काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी व विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते.
राज्यात सध्या ६२ ते ६५ हजारांच्या आसपास कंट्रोल व बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. अतिरिक्त यंत्रांसाठी मध्य प्रदेश निवडणूक आयोगाची मदत घेतली जाईल. गरजेनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाचीही मदत घेतली जाईल. मतदार 'ईव्हीएम'वर चारवेळेस मतदान करतील. उमेदवार संख्या जास्त असल्याने व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नसल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
निवडणुकांसाठी एक जुलै २०२५ ची मतदारयादी ग्राह्य धरणार. विधानसभेप्रमाणेच राज्यामध्ये आचारसंहिता लागू असणार.
सहा ऑक्टोबरपर्यंत वॉर्ड, प्रभागरचनेचा कार्यक्रम पूर्ण होणार. ओबीसी आरक्षण हे लॉटरी पद्धतीने रोटेशनमध्ये काढले जाणार.
२०११ च्या जनगणनेनुसार एसी, एसटी प्रवर्गासाठी जागा राखीव.
आयोग ५० हजार कंट्रोल व १ लाख बॅलेट युनिट खरेदी करणार.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.