Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर सर्किट बेंच नाही मी खंडपीठच म्हणेन : सरन्यायाधीश भूषण गवई

कोल्हापूर सर्किट बेंच नाही मी खंडपीठच म्हणेन : सरन्यायाधीश भूषण गवई

कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर सर्किट बेंचचे रूपांतर लवकरच खंडपीठात होईल. मी तर कोल्हापूर सर्किट बेंच म्हणणे बंद करतो, मी खंडपीठच म्हणेन. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी लवकरात लवकर सर्किट बेंचचे कायमस्वरूपी खंडपीठ कसे होईल, यासाठी प्रस्ताव पाठवावा. माननीय मुख्यमंत्र्यांकडून त्याला निश्चित योग्य प्रतिसाद मिळेल, असे म्हणत कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले आहेत.

कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी सरन्यायाधीश गवई हे बोलत होते.  सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. 40 ते 45 वर्षांपूर्वी ज्यांनी हे स्वप्न पाहिले त्या स्वप्नपुर्तीत आम्ही सहभागी झालो. अस्पृश्यतेविरोधात छत्रपती शाहू महाराजांचा लढा सर्वांनाच माहिती आहे. राज्याभिषेकानंतर त्यांनी पहिला जाहीरनामा केला, त्यात वाक्य होते की, 'आपल्याला मिळालेला अधिकार हा उपभोग घेण्यासाठी नसून रंजल्या गांजलेल्यांच्या उद्धारासाठी आहे.'

त्याच विचाराला अनुसरून वकील, न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीश म्हणून काम करत आहे. पद हे अधिकार गाजवण्यासाठी नाही तर नियतीने दिलेली सेवेची संधी आहे. शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षण मागास जातींना दिले. मोफत शिक्षणाचा कायदा केला. वसतिगृहे स्थापन केली. जातीभेद दूर करण्यासाठी दलित व्यक्तीला हॉटेल उघडण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या हॉटेलमध्ये स्वतः चहा पिण्यासाठी गेले. विधवांना पुनर्विवाहचा कायदा केला. त्यांचा जन्मदिवस आपण देशभर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीत शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक अडचणीच्या काळात शाहू महाराजांनी स्कॉलरशिप देऊन त्यांना परदेशात पाठवले, असे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या लंडनमधील घराचे स्मारकात रुपांतर केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'मूकनायक' वृत्तपत्र सुरू करण्यासाठी शाहू महाराजांनी 3000 रुपयांची मदत केली. शाहू महाराज म्हणाले होते की, 'तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला. माझी खात्री आहे, डॉ. आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. ते एकदिवस या देशाचे पुढारी होतील.' शाहू महाराजांचे भाकीत खरे ठरले. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण दैवत मानतो. शाहू महाराजांचे वंशज खासदार शाहू महाराज यांनी माझे स्वागत केले, हे मी विसरू शकणार नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.

कोल्हापूर सर्किट बेंचचे रूपांतर लवकरच खंडपीठात होईल. मी तर कोल्हापूर सर्किट बेंच म्हणणे बंद करतो, मी खंडपीठच म्हणेन. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे यांना सांगू इच्छितो की, तुम्हाला कोल्हापुरकरांचा, शाहू महाराजांचा, महालक्ष्मीचा आशिर्वाद मिळेल. त्यांच्या निवृत्तीला किती दिवस उरले आहेत मला माहिती नाही. पण, लवकरात लवकर सर्किट बेंचचे कायमस्वरूपी खंडपीठ कसे होईल, यासाठी प्रस्ताव पाठवावा. माननीय मुख्यमंत्र्यांकडून त्याला निश्चित्त योग्य प्रतिसाद मिळेल. माझ्याकडे सव्वा तीन महिन्यांचा कालखंड आहे तो मी कमी समजत नाही. गेल्या तीन महिन्यात मी देशभरातील उच्च न्यायालयात 50 नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहितीही सरन्यायाधीश गवई यांनी दिली.

पुण्याचे वकील माझ्याकडे आले होते. ते म्हणाले होते की, पुण्यात खंडपीठ होण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्या. मी म्हटले वडीलांनी मला शिकवलंय की, कुणाचे नुकसान करायचे नाही. त्यांच्याकडे 4 ते 5 हजार वकील झाले आहेत, म्हणून त्यांची खंडपीठाची मागणी होती. मी म्हटले विचार वकीलांचा नाही तर नागरिकांचा करायचा, असेही गवई यांनी सांगितले.

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक अराधे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नेते, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.