माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दीर्घ आजाराने दिल्लीत निधन
दिल्ली : खरा पंचनामा
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालं. बऱ्याच काळापासून ते आजारी होते. रुग्णालयात उपचारावेळी त्यांचं निधन झालं. एकेकाळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं.
पक्षाने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं होतं. याशिवाय चार राज्यांचं राज्यपालपदही भूषवलं होतं. मात्र गेल्या काही वर्षात भाजपसोबत त्यांचं बिनसलं होतं. त्यांनी पुलवामा हल्ला प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.
भाजपमध्ये भ्रष्टाचाराचा दावाही सत्यपाल मलिक यांनी केला होता. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक पक्ष बदलले. मात्र स्वतःला त्यांनी जाट आणि शेतकरी नेते म्हणून सांगितलं होतं. ते स्वतःला लोहियावादी मानत होते. तर चौधरी चरण सिंह यांना राजकीय गुरु असल्याचं सांगायचे.
उत्तर प्रदेशातील बागपतमधील हिसावदा गावात २४ जुलै १९४६ रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. विद्यार्थीदशेतच ते राजकारणाकडे वळले. आपल्या राजकीय कारकिर्दीचं श्रेय त्यांनी चौधरी चरणसिंह यांना दिलं.
वयाच्या २८ व्या वर्षी १९७४ मध्ये बागपत विधानसभा मतदारसंघातून सत्यपाल मलिक आमदार झाले होते. तर १९८० मध्ये लोकदलाच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. आणीबाणीच्या काळात काँग्रेसला विरोध केला आणि तुरुंगातही जावं लागलं. आणीबाणीवर टीका केल्यानंतर १९८४ मध्ये ते काँग्रेसमध्येही गेले होते.
काँग्रेसमधून बाहेर पडत जन मोर्चा पार्टी स्थापन केली. १९८८मध्ये त्यांनी जनता दलात पक्ष विलीन केला. १९८९मध्ये अलीगढमधून ते खासदार झाले. त्यानंतर समाजवादी पार्टीत प्रवेश केला. १९९६ मध्ये समाजवादी पार्टीच्या तिकिटावर अलीगढमधून निवडणूक लढले पण यात त्यांना पराभवाचा धक्का बसला.
२००४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण बागपतमध्ये पराभूत व्हावं लागलं. पक्षाने त्यांना २०१२ मध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं होतं. त्यानंतर २०१७ मध्ये बिहारचं राज्यपाल बनवलं. २०१८मध्ये जम्मू काश्मीर, २०१९मध्ये गोवा आणि २०२० मध्ये मेघालयचं राज्यपाल पद भूषवलं होतं.
सत्यपाल मलिक आणि भाजप यांच्यात शेतकरी आंदोलनानंतर बिनसायला सुरुवात झाली. २०२२ मध्ये सत्यपाल मलिक हे मेघालयचे गव्हर्नर होते. त्यावेळी दिल्लीच्या सीमेवर ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. कुत्र्याचा मृत्यू झाला तरी वेदना होतात पण शेतकऱ्यांसाठी एकही चिठ्ठी दिल्लीहून आली नाही असं त्यांनी म्हटलं होतं. पुलवामा हल्ल्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केला होते. केंद्र सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे हा हल्ला झाला. इतकंच नाही तर या हल्ल्याचा वापर भाजपने निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी केल्याचा आरोपही केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.