नेपाळमध्ये तुरुंग फोडून पळून जाणाऱ्या कैद्यांवर लष्कराकडून गोळीबार; दोन ठार, 12 जण जखमी
काठमांडू : खरा पंचनामा
नेपाळमधील Gen-Z आंदोलन हिंसक वळण घेत असून, देशातील अस्थिरता वाढत आहे. गुरुवारी सकाळी रामेछाप जिल्हा तुरुंगातून मोठ्या संख्येने कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते.
हा प्रयत्न रोखण्यासाठी नेपाळी लष्कराने गोळीबार केला. यात दोन कैद्यांचा मृत्यू झाला असून १२ ते १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
रामेछाप जिल्ह्याचे मुख्य जिल्हा दंडाधिकारी श्यामकृष्ण थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील कैद्यांनी आतली अनेक कुलपे तोडून मुख्य दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केला. सुरक्षादलांनी तातडीने कारवाई करत गोळीबार केला. लष्कर गेटवर पोहोचताच कैद्यांवर कारवाई करण्यात आली. तुरुंगात सध्या ८०० हून अधिक कैदी आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती आता नियंत्रणात आणण्यात आली आहे.
काठमांडू पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, Gen-Z आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशभरात तुरुंग फोडण्याच्या घटना वाढल्या. नेपाळच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अशा घटनेत २५ हून अधिक तुरुंगांमधून १५ हजारांहून अधिक कैदी पळून गेले. त्यापैकी काही कैदी स्वेच्छेने परतले, तर काहींना लष्कराने पुन्हा पकडले आहे. तुरुंग सुरक्षेसाठी आता नेपाळ पोलिस व सशस्त्र दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
नेपाळमध्ये अलीकडेच २६ सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. याच्या निषेधार्थ Gen-Z रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी संसद भवनासह अनेक सरकारी इमारतींना आग लावली. या संघर्षादरम्यान तब्बल ३० जण ठार झाले तर १००० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत.
या आंदोलनानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर देशातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराने पुढाकार घेतला. राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला असून तो शुक्रवार सकाळपर्यंत वाढवण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.