Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डिजिटल अटकद्वारे निवृत्त बँकरला 23 कोटींचा चुना

डिजिटल अटकद्वारे निवृत्त बँकरला 23 कोटींचा चुना

मुंबई : खरा पंचनामा
 
सायबर गुन्हेगारांनी आणखी एक मोठा डल्ला मारला आहे. त्यांनी चक्क मुंबई पोलिसांचे नाव वापरून निवृत्त बँकरचे बँक खाते 23 कोटी रुपयांनी हलके केले आहे. डिजिटल अरेस्टमधील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी फसवणूक आहे. या प्रकरणी बँकरने शुक्रवारी (19 सप्टेंबर) तक्रार दाखल केल्यानंतर ही धक्कादायक फसवणूक समोर आली आहे.

दिल्लीतील हौज खास जवळील गुलमोहर पार्क परिसरात हा बँकर (78) राहतो. 1 ऑगस्ट रोजी त्याला लँडलाइनवर एक कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी मुंबई पोलीस असल्याची ओळख दिली. त्यावेळी मुंबईतील लँडलाइन त्याच्या आधार कार्डशी जोडण्यात आल्याचे सांगितले. नंतर पुन्हा फोन करून बँकरचे आधार कार्ड दहशतवादी निधीसाठी वापरल्या जाणाऱ्या बँक खात्याशी लिंक असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना दिलेल्या पैशांचाही या बँकरच्या आधार कार्डशी संबंध असल्याचे सांगितले. या माहितीने बँकर हादरून गेला.

बँकर घाबरल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी बँकरकडे त्याच्या बँक खात्यांबद्दल, मालमत्ता, डीमॅट खात्यांबद्दल आणि कुटुंबातील सदस्यांबद्दल वैयक्तिक माहिती मागितली. त्यानंतर बँकरला डिजिटल कोर्टाचा बनावट आदेश पाठवला. शिवाय त्याला बनावट डिजिटल कोर्टासमोर हजर करण्यात आले. या कोर्टाने बँकरला जामीन मंजूर केला. त्यासाठी बँकरला त्याचे सर्व पैसे ठराविक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. तसेच त्याचा पासपोर्ट जप्त केला. बँकरने त्याच्या खात्यातील सर्व पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्याला राष्ट्रीय गोपनियता कायद्याअंतर्गत ही माहिती कोणालाही न उघड करण्याची ग्वाही देण्यास सांगितले. तसेच जर त्याने ही माहिती उघड केली तर त्याच्या दोन मुली, त्यांचे पती आणि मुलांची हत्या करण्याची धमकीही दिली.

गंभीर बाब म्हणजे न्यायालये जामिनाच्या अटी लावतात त्याप्रमाणे, डिजिटल कोर्टाने निवृत्त बँकरला अटी घातल्या होत्या. त्याप्रमाणे सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत दर दोन तासांनी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसमोर (म्हणजे सायबर फसवणूक करणारे) हजर राहण्यास सांगितले होते. निवृत्त बँकर त्याच्या दिल्लीतील घरात एकटाच राहतो. या प्रकारे एक महिना या बँकरला त्यांनी वास्तवात नसलेली डिजिटल अटक केली होती. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या बँकरने दिल्ली पोलिसांत तक्रार केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.