आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : खरा पंचनामा
महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियानांतर्गत माधवनगर रोड, माळबंगला सांगली येथे अग्निशमन केंद्राचे लोकार्पण, अग्निशमनासाठी अत्याधुनिक वाहने तसेच दीनदयाळ जन आजीविका योजनेंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त 9 कचरा संकलन इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शासन व महानगरपालिका निधीतून माळबंगला सांगली येथे बांधण्यात आलेले अग्निशमन केंद्र 24 तास सुरू राहणार आहे. महानगरपालिका क्षेत्र, नजिकच्या माधवनगर ग्रामपंचायतीच्या मोठ्या असलेल्या बाजारपेठेत तसेच शेजारील ग्रामीण भागात आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी हे अग्निशमन केंद्र अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, उपायुक्त स्मृती पाटील, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
शासन निर्णय 25 फेब्रुवारी 2025 अन्वये अग्निशमन व आपत्कालिन सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियानांतर्गत 70 टक्के शासन निधी व 30 टक्के महापालिका निधी नुसार 4 कोटी 95 लाख रूपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी शासन हिस्साचे 70 टक्के 3 कोटी 46 लाख 50 हजार रूपयांपैकी पहिला टप्पा हा 2 कोटी 50 लक्ष रूपये इतका निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सांगली शहरातील माधवनगर रोड येथे माळबंगला जल शुध्दीकरण केंद्र येथे अग्निशमन केंद्र (FS-/II) टाईप व सांगली मधील हनुमाननगर मनपा एसटीपी जवळ अग्रिशमन केंद्र (FS-/III) बांधण्याकरिता तसेच, नवीन चार अग्निशमन वाहने खरेदी करण्यासाठी या निधीचा विनियोग करण्यात येत आहे. अग्निशमन केंद्र कामांतर्गत अग्निशमन विभागाचे कार्यालय, नियंत्रण कक्ष, वर्कशॉप स्टोअर, कर्मचारी यांचेसाठी निवासस्थान, पार्किंग यांचा समावेश आहे. यातील अग्निशमन विभागाचे कार्यालय, नियंत्रण कक्षाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. तसेच, अग्निशमन विभागाकडे वाहने दाखल झालेली आहेत. FS-/II प्रकारच्या अग्निशमन केंद्रात तीन अग्रिशमन वाहने व दोन जीप असे स्वरुप आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे आणि सचिन सागावकर, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, महेश मदने, ऋतुराज यादव आदि उपस्थित होते.
कचरा संकलनासाठी 9 इलेक्ट्रिक वाहनांचेही लोकार्पण
दीनदयाळ जन आजीविका योजनेंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त 9 कचरा संकलन इलेक्ट्रिक वाहनांचेही लोकार्पण यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शहरामध्ये कचरा व्यवस्थापनाचे मानक सुधारण्यासाठी कचरा संकलन आणि व्यवस्थापनासाठी या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात येईल.
DAY- NULM व संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) भारत यांच्या सहकार्याने, अभियानांतर्गत महाराष्ट्र व आसाम या राज्यातील निवडक शहरामध्ये कचरा व्यवस्थापनाचे मानक सुधारण्यासाठी कचरा संकलन आणि व्यवस्थापनासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचा यशस्वी प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या अनुषंगाने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेस ९ इलेक्ट्रिक वाहने प्राप्त झाली आहेत. एका इलेक्ट्रिक वाहनावर एक वाहनचालक व सहाय्यक अशा २ महिला घेण्यात आल्या असून एकूण १८ महिलांना काम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बचत गटातील ज्या महिला कचरा संकलन करतात, त्या महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच विधवा, परित्यक्त्या या महिलांना महापालिकेच्या वतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांचे वाहन चालन परवाना पूर्तता करुन घेण्यात आली आहे. या गाड्यामार्फत शहरातील कचरा संकलन करण्यात येणार आहे. या कामी उपायुक्त स्मृती पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील एकूण पाच महानगरपालिकांना अशी वाहने प्राप्त झाली असून यापैकी सांगली मिरज कुपवाड महापालिका एक आहे.
हा उपक्रम उत्सर्जन कमी करणे साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल. तसेच इलेक्ट्रिक वाहने यांचा देखभाल व दुरुस्ती खर्च तुलनेने कमी असतो. तसेच यामुळे शहरातील स्वच्छता / घनकचरा व्यवस्थापनाची गुणवत्ता वाढविता येईल. ज्या महिला कचरा व्यवस्थापनांतर्गत काम करतात, त्यांच्या परिश्रमामध्ये घट होईल.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अग्निशमन केंद्राची पाहणी करून केंद्रास प्राप्त साधनसामग्रीची सविस्तर माहिती घेतली. तसेच, कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवरील महिलांशी संवाद साधला. यावेळी प्रकल्पप्रमुख ज्योती सरवदे, श्रीमती सवाखंडे, बचतगटाच्या सदस्या उपस्थित होत्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.