लालबागचा राजा विसर्जन विलंबाची चौकशी करा!
मच्छीमार समितीची भूमिका
मुंबई : खरा पंचनामा
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने चौकशीची मागणी केली आहे. विसर्जन प्रक्रियेतील गोंधळामुळे गणरायाचे विसर्जन चंद्रग्रहणाच्या वेळी झाल्याने लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
तसेच दर्शनादरम्यान भाविकांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे आरोपही समितीने केले. समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात ई-मेलद्वारे तक्रार केली आहे.
लालबागच्या राजाची स्थापना १९३४मध्ये कोळी समाजातील महिलांनी केली होती. आता या उत्सवाचे बाजारीकरण झाले असून, भक्तांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. एका मुलीला दिलेल्या अमानुष वागणुकीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याचे तांडेल यांनी सांगितले. तक्रारीत मंडळातील जबाबदार सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, दोषी कार्यकर्त्यांना अटक करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्हीआयपी संस्कृती रोखण्यासाठी दर्शन प्रक्रियेत बदल करून सर्वसामान्यांसाठी सोयीस्कर व्यवस्था करावी, चेंगराचेंगरी टाळण्यासाठी मंडप मोकळा ठेवावा, असेही समितीने सुचवले आहे. श्रीगणेश हे कोणाच्या मालकीचे नसून ते सर्वांचे आहेत. विसर्जनावेळी कोळी बांधवांना डावलण्यात आले, हा कोळी समाजाचा अपमान आहे. 'लालबागचा राजा' पुन्हा समाजाच्या भावनांशी जोडला जावा, अशी मागणी समितीने केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.