'देवाभाऊ'ला 'देवा तूच सांग'ने शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर
नाशिक : खरा पंचनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'देवा भाऊ' या जाहिरातीला शरद पवार गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'देवाभाऊ तूच सांग' या बॅनरने आणि अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरील जाहिरातीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आज एकदिवसीय शिबिर होत आहे. नाशिकमध्ये आयोजित शिबिरापूर्वीच 'देवा तूच सांग' या बॅनर आणि जाहिरातीची राज्यभरात चर्चा सुरू आहे. प्रमुख दैनिकांच्या पहिल्या पानावरील या जाहिरातीने नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
या जाहिरातीमध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा कायदा, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, युवकांना नोकरी आणि असुरक्षित महिला यांसारख्या प्रश्नांवरून सरकारला प्रश्न विचारण्यात आले आहेत.
"देवा तूच सांग" असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार, असा सवाल करण्यात आला आहे. तर उद्या नाशिकमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
"आमच्या पक्षाने दिलेली जाहिरात आहे. आम्ही स्वयंघोषित देवाला याबाबत बोलत नाही. आम्ही आमच्या देवाबाबत विठ्ठलाला साकडे घातले आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापलं नव्हतं. आमची जाहिरात बघा आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही. याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? कारण 190 कोटी रुपये त्यांचे माफ झाले आहेत. दादांचे पोस्टर कमी देवाभाऊचे पोस्टर त्यांनी जास्त लावले आहेत." असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत गुलाबी रंगाचे कॅम्पेन राबवले. गुलाबी जॅकेटची तेव्हा मोठी चर्चा झाली. तर आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने जाहिरातीत पिवळ्या रंगाची उधळण केली आहे. यावरुन पिवळ्या रंगाने गुलाबी रंगाला उत्तर की ओबीसीला खुणावत आहात?, असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला.
यावर पिवळा रंग सूर्याचा रंग आहे. आम्ही पुन्हा उजळत आहोत. पुन्हा झेप घेत आहोत म्हणून हा रंग वापरला आहे. गुलाबी रंगाला उत्तर नाही, असं रोहित पवारांनी सांगितले. मात्र देवा भाऊंच्या टीकेला आता 'देवा तूच सांग' च्या जाहिरातीने उत्तर देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.