प्रशांत किशोर यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा दावा
पाटणा : खरा पंचनामा
जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्याविरोधात बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. अशोक चौधरी, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, आरोग्य मंत्री मंगल पांडे आणि भाजपचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष खासदार दिलीप जायस्वाल यांच्यावर प्रशांत किशोर यांनी आर्थिक आणि नैतिक भ्रष्टाचाराचे आरोप नुकतेच केले आहेत.
सातवी इयत्ता अनुत्तीर्ण असताना परदेशातून पीएच.डीची खोटी पदवी मिळविणे, खुनाच्या आरोपात सहभाग, जन्मतारखेत फेरफार केल्याचा आरोप सम्राट चौधरी यांच्यावर केला होता. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील ग्रामीण विकास मंत्री अशोक चौधरी यांच्यावर २०० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती निर्माण केल्याचा आरोप आहे.
प्रशांत किशोर यांनी अस्वस्थतेतून आणि भीतीपोटी केलेला आरोप निराधार आणि खोटा आहे. यातून ते जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा दावा अशोक चौधरी यांनी केला. त्यांनी यापूर्वीही प्रशांत किशोर यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. न्यायाधीशांनी किशोर यांना १७ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता.
चौधरी यांनी प्रशांत किशोर यांच्यावर १०० कोटींचा मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यानुसार किशोर यांनी सात दिवसांत पत्रकार परिषद घेऊन लेखी किंवा तोंडी बिनशर्त माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई आणि १०० कोटींची भरपाई देण्यासाठी दिवाणी खटला दाखल करण्यात येईल, अशा इशारा चौधरी यांनी दिला आहे.
भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राजकुमार ऊर्फ आर. के. सिंह यांनी आक्रमक पवित्रा घेत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि मंत्री अशोक चौधरी यांना आरोपांवर स्पष्टीकरण द्या अथवा पद सोडा असे सुनावले आहे. आरा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळविण्यास अपयश आल्यापासून ते नाराज आहेत माध्यमांशी झालेल्या चर्चेच्या मालिकेत ही टिप्पणी केली. ते म्हणाले, की मी जे काही बोललो त्यावर मी ठाम आहे. मंत्र्यांवरील या आरोपांमुळे राज्यातील पक्ष आणि राज्य सरकारची बदनामी होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.