Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या!

सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या!

नागपूर : खरा पंचनामा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सालाबादाप्रमाणे विजयादशमीचा कार्यक्रम साजरा करणार आहे. यादिवशी बौद्धिक ठेवण्यात येते. विचारांची उधळण करण्यात येते. संघाच्या अमरावती येथील शाखेने यंदा विजयादशमी उत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कमला गवई यांना निमंत्रण धाडले. त्यांनी ते स्वीकारले आहे. कमला गवई या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आहेत. त्या दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाशी नाळ जोडलेली असताना त्या संघाच्या कार्यक्रमात विचार पुष्प गुंफणार असल्याने त्याची सध्या चर्चा होत आहे.

5 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या पटांगणात संध्याकाळी 6 वाजता विजयादशमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारणीचे सदस्य आणि प्रज्ञा प्रवाहाचे संयोजक जे. नंदकुमार या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील. तर कमलाताई या सुद्धा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून विचार मांडतील.

त्यांचे पती आणि सरन्यायाधीशांचे वडील रा.सू. गवई यांनी विदर्भात रिपब्लिकन पक्षाची जबाबदारी संभाळली. गवई कुटुंब रिपब्लिकन चळवळीशी संबंधित आहेत. कमलाताई आता संघाच्या व्यासपीठावर जात असल्याने आंबेडकरी चळवळीत चर्चा होत आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना रा. सू. गवई हे मंत्री होते. ते पवारांचे निकटवर्तीय मानले जात. पुढे ते राज्यपाल झाले. रा.सू.गवई यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र राजेंद्र गवई हे रिपब्लिकन पक्षाची धुरा सांभाळत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्याला नागपूरसह प्रत्येक शाखेवर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीला खास निमंत्रण देण्यात येते. संघाच्या अमरावती येथील शाखेने यंदा विजयादशमी उत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कमला गवई यांना निमंत्रण देण्यात आले होते. ते त्यांनी स्वीकारले. त्या 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विजयादशमीच्या उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावतील. अमरावती येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या पटांगणात संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात त्या काय विचार मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.