कर्मवीर मामांचा सच्चा भक्त!
डोईवर स्वप्नांचे गाठोडे घेवून आयुष्यभर धडपडणारे डॉ. बी. वाय. यादव
कुणीतरी बार्शीला मेडिकल कॉलेज द्या हो!
राजा माने,
संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक.
कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगली जिल्ह्यातील नेर्ले या गावातील घराघरातून, वाड्या - वस्त्यावरुन "मूठभर धान्य" संकलित करुन "रयत" चा "शैक्षणिक यज्ञ" तेवत ठेवण्याची चळवळ मोठ्या कष्टाने उभी केली होती. तसाच कर्मवीर पुत्र मामासाहेब जगदाळे यांच्या रुपाने बार्शी तालुक्याने मराठवाड्याच्या प्रवेशद्वारी जन्मी घातला! ज्याने गोर- गरीब माणसाच्या जीवनात ज्ञानक्रांतीची ज्योती पेटविली. ती पेटवत असताना निस्वार्थी, इमानी आणि निर्मळ मनाच्या संवेदनशील अनुयायांची फळी तयार केली. त्याच अनुयायांच्या फळीतील बिनीचे शिलेदार म्हणजे डॉ. बी. वाय. यादव!
गेली पाच दशके हा शिलेदार कर्मवीर मामांच्या स्वप्नांचे गाठोडे डोईवर घेऊन अव्याहतपणे धडपडतो आहे. स्वर्गीय मामा जेवढे हलवे तेवढेच आक्रमकही होते. त्यांच्या व्यक्तिमत्वातील शिवराळ शैलीचे अनेक किस्से आजही सांगितले जातात. स्व. मामांच्या त्या शैलीच्या विरुद्धचा स्वभाव पिंड असलेल्या डॉ. बी. वाय. यादव या त्यांच्या अनुयायी भक्ताने श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचा संसार गेली पन्नासहून अधिक वर्षांपासून लिलया यशस्वीरित्या सांभाळला. डोईवरचे स्वप्नांचे गाठोडे हलके करताना ट्रॉमा सेंटर सारखे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प साकार केले.
खरे तर बार्शी तालुक्याच्या राजकारणात अनेक ऐतिहासिक स्थित्यंतरे घडली. त्याची छाया डॉ. यादव यांनी स्वतःवर किंवा संस्थेवर कधी पडू दिली नाही. उलट बार्शीतील प्रत्येक चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले व आजही राहतात. मी माझ्या लहानपणापासून डॉ, यादव सरांना पहात आलो आहे. ते तेंव्हा होते तसेच आजही दिसतात! त्यांच्या दिसण्यात आणि व्यक्तिमत्वात बदल का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा ज्यावेळी मी प्रयत्न केला तेव्हा मला एक गुपित सापडले! निर्मळ मन, निस्पृह साधेपणा आणि कर्मवीर मामांवरील निस्सीम भक्ती, ही डॉ. यादव यांची बलस्थाने आहे आणि त्यामुळेच ते तसे आहेत, हे मला उमजले. त्याच कारणाने डॉ. सुनीलकुमार लवटे सारख्या लेखक, विचारवंत आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाच्या प्रेमाचे धनी ठरतात. डॉ. बी. वाय. यादव या आपल्या लाडक्या चिरतरुणाचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा तमाम बार्शीकर करीत आहेत. एक संवेदनशील, दिलदार आणि दातृत्वाची दानत असलेले महाराष्ट्राचे नेते व भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख साक्षीने व सोलापूर जिल्ह्याचे आध्यात्मिक वैभव ह. भ. प. डॉ. जयवंत महाराज बोधले, माजी मंत्री आमदार दिलीप सोपल, खा. ओमराजे निंबाळकर, माजी आमदार डॅशिंग नेते राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडत आहे.
डॉ. यादव यांच्या डोईवर असलेल्या कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या स्वप्नांच्या गाठोड्यात मेडिकल कॉलेज देखिल दडलेले आहे. डॉ. यादव सराना मनापासून शुभेच्छा देताना मेडिकल कॉलेजचे स्वप्न साकार व्हावे ही भावना बार्शीकर ठेवणारच! म्हणूनच... कुणीतरी बार्शीला मेडिकल कॉलेज द्या हो!
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.