नागरिकांकडून सन्मान हीच कामाची पोहोच पावती : महानिरीक्षक फुलारी
मिरजेतील श्री गांधी चौक गणेशोत्सव मंडळातर्फे कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना सन्मानपत्र प्रदान
सांगली : खरा पंचनामा
पोलीस अधिकारी, अंमलदार कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडत असतात. बऱ्याच वेळा पोलीस नागरिक, पत्रकार यांच्या टिकेचे धनी व्हावे लागते. तरीही पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असतात. मात्र नागरिकांकडून, गणेश मंडळाकडून सन्मान होणे हीच आमच्या कामाची पोहोच पावती आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केले.
मिरज येथील महात्मा गांधी चौक गणेशोत्सव मंडळातर्फे महानिरीक्षक फुलारी यांना मंगळवारी सांगलीतील पोलीस अधीक्षक कार्यालतातील कार्यक्रमात सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. फुलारी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य जहीर अहमद मुजावर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यावेळी मुजावर यांनी महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी कोल्हापूर परीक्षेत्राचा कार्यभार घेतल्यापासून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या तीन वर्षात महानिरीक्षक फुलारी यांच्या नेतृत्वात भीमा कोरेगाव येथील अभिवादन दिन, गणेशोत्सव, ईद, नवरात्रोत्सव, विधानसभा, लोकसभा तसेच स्थानिक पातळीवरील निवडणुका शांततेत पार पडल्या. याची हॅट्रिक त्यांनी केली याचे रेकॉर्ड परीक्षेत्रात झाल्याची माहिती दिली. त्याशिवाय त्यांनी गुन्हेगारांवर मोकासह केलेल्या कारवाया यासाठी त्यांना सन्मानपत्र देत असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना महानिरीक्षक फुलारी म्हणाले, भविष्यात तरुण पिढी व्यसनमुक्त होऊन चांगले नागरिक तयार व्हावेत यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरु आहेत. परीक्षेत्रातील पाचही जिल्हे नशामुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील. पोलिसांच्या चांगल्या कामाची दखल घेतली जाते याचे समाधान वाटते असेही ते म्हणाले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रभात हेटकाळे, धनंजय गडदावर, अशोक कदम, विनायक शेडबाळे, पप्पू सावंत, विजय अस्वले, विनोद सावंत, अभिषेक भोसले, पप्पू सावंत, प्रभाकर अस्वले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यावेळी मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिलडा, तासगावचे उपाधीक्षक अशोक भवड, जतचे उपाधीक्षक सचिन थोरबोले, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, सांगली शहरचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, इस्लामपूरचे निरीक्षक संजय हारूगडे, महात्मा गांधी चौकचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, कुपवाडचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.