हनीट्रॅपद्वारे खंडणी उकळणाऱ्या तीन महिलांविरुद्ध गुन्हा
अकोले : खरा पंचनामा
एका तरुणावर खोट्या प्रेमाचे जाळे टाकून, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत रक्कम (खंडणी) घेणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले. प्राजक्ता मुंगसे (रा. सिन्नर) असे या महिलेचे नाव आहे.
संगमनेर तालुक्यातील एका तरुणाने या प्रकरणी अकोले पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. दोन महिन्यांपूर्वी संगमनेर येथे राहणाऱ्या कविता विशाल विधाते या महिलेसोबत त्याची ओळख झाली होती. एकमेंकांचा मोबाईल नंबर घेवून, ते दररोज बोलत होते. या महिलेसमवेत वडगाव पान येथे तो गेला असता, 'मला तुम्ही आवडता,' असे म्हणत तिने प्रेमाची मागणी केली होती.
कविता हिने त्या तरुणाला अकोले येथील मैत्रीण छाया धुमाळ हिचा मोबाईल नंबर दिला. त्याने, छाया धुमाळ हिला कॉल केला असता, ती म्हणाली की, तुम्हाला प्रेम करायला कवितासारख्या महिला मी देते, तुम्ही अकोले येथे या,' असे सांगत, तिने त्याला एका इसमाचा मोबाईल नंबर दिला. या इसमाने तरुणाला खडी क्रेशरजवळील खोलीमध्ये नेले. तेथे एकजण त्याला म्हणाला की, 'ही माझी पत्नी आहे, तू हिच्यासमवेत काय करीतोस,' असे म्हणत, त्याने मोबाईलमधून व्हिडिओ शुटींग सुरु केले. तरुणाला धमकी देत, मारहाण केली. 'ती महिला तरुणाला धमकावित म्हणाली की, हे प्रकरण मिटवायचे असेल तर, आम्हाला एक लाख रुपये दे. प्रकरण येथेच मिटवू. रक्कम न दिल्यास मी पोलिस स्टेशनमध्ये जाईल. तुझ्याविरुध्द तक्रार दाखल करील, अशी धमकी दिली.
यानंतर तरुणाने तिला 7 हजार रुपये दिले. यानंतर पुन्हा 15 हजार रुपये त्या महिलेस फोन पेद्वारे दिले. यानंतर, 'उरलेली रक्कम मला द्या, अन्यथा मी पोलिसात तक्रार दाखल करील, अशी धमकी तिने दिली. घाबरलेल्या अवस्थेत तरुणाने तिला 45 हजार रुपये दिले. पुन्हा फोन पे नंबरवर 10 हजार रुपये पाठविले. पुन्हा संगमनेर बस स्थानक येथे 14 हजार रुपये दिले, परंतू तरुणाला मोबाईल कॉल करुन, 'आज रक्कम न दिल्यास, 'त्या दिवस' चा व्हिडिओ व्हायरल करील,' अशी धमकी ती देत होती. मी तुम्हाला रक्कम देतो, परंतू माझा व्हिडीओ व्हायरल करु नका,' असे म्हणत, तरुणाने कॉल कट केला, परंतू त्या महिलेच्या दररोजच्या जाचासह धमक्यांना कंटाळून अखेर तरुणाने, अकोलेचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांना सर्व घटना कथन केली. यानंतर पुन्हा प्राजक्ता मुंगसे या महिलेने तरुणाकडे रकमेची मागणी केली असता, त्याने 6 हजार रुपये दिले. तरुणाच्या हातातून सहा हजार रुपये घेताच, पोलिसांनी पंचांसमक्ष प्राजक्ता रावसाहेब मुंगसे हिला रंगेहात ताब्यात घेतले.
कविता विशाल विधाते, छाया संजय धुमाळ व प्राजक्ता रावसाहेब मुंगसे या महिलांनी कटकारस्थान रचून, तरुणाच्या ओळखीचा गैरफायदा घेवून, धमकावणे, मारहाण करुन, बळजबरी खंडणी स्वरुपात रोकड उकळून त्याची फसवणूक केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक खांडबहाले करीत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.