Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणासाठी 13 ऑक्टोबरला सोडत

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणासाठी 13 ऑक्टोबरला सोडत

मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरुस्त्या याबाबत हरकती आणि सूचना मतदार दाखल करू शकतात.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पाडण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना 10 कोटी 8 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

राज्यातील 247 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.