5000 गाड्या 'टोल फ्री' गेल्या!
बोनस कमी दिल्याने कर्मचाऱ्यांनी टोल गेट उघडेच ठेवले
लखनऊ : खरा पंचनामा
देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. दिवाळी म्हटल्यावर कर्मचाऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बोनस! दिवाळीत मिळणारा बोनस हा आपला हक्क असून तो मिळालाच पाहिजे असं जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांचं म्हणणं असतं. बरं मनासारखा बोनस मिळाला नाही तर नाराज होणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र ही नाराजी कंपनीच्याच मूळावर उठली तर? असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे.
उत्तर प्रदेशमधील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील फतेहाबाद टोल प्लाझावरील कर्मचारी कमी बोनस मिळाल्याने नाराज होते. मात्र ही नाराजी त्यांनी कृतीतून व्यक्त केल्याने टोलचं कंत्राट घेतलेल्या कंपनीला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. कमी बोनस मिळाल्याच्या निषेधार्थ या टोलनाक्यावरील सर्व कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन टोलची सर्व गेट रात्रभर उघडी ठेवली. या कालावधीमध्ये या टोलवरुन जवळपास 5 हजार वाहने एक रुपयाही न भरता गेली. कर्मचाऱ्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे शनिवारी रात्री ते रविवार सकाळपर्यंत या मार्गावर वाहनचालकांना टोलमाफी मिळाली.
शनिवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत टोल गेट उघडी ठेवण्यात आली होती. सर्व कर्मचाऱ्यांना केवळ 1100 रुपयांचा दिवाळी बोनस दिल्याने ते नाराज होते. आपला निषेध नोंदवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी टोल प्लाझावरील सर्व बूम बॅरियर्स उघडले आणि धरणे आंदोलन केले. या काळात कोणत्याही वाहनाकडून टोल वसूल करण्यात आला नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.