महाराष्ट्राचा 'सिंघम' थेट बिहारमधील दोन-दोन मतदारसंघातून मैदानात उतरणार!
पटना : खरा पंचनामा
बिहारमध्ये कधी काळी 'सुपर कॉप' आणि 'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आता राजकारणात जाण्याचा निर्णय घेतलाय. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर लांडे यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीत जमालपूर आणि अररिया या दोन मतदारसंघांतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. आपल्या कठोर आणि प्रामाणिक प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेले लांडे आता राजकारणात परिवर्तनाची सुरुवात करू इच्छित आहेत.
शिवदीप लांडे यांनी काही काळापूर्वी 'हिंद सेना पार्टी'ची स्थापना केली होती आणि या पक्षाच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, पक्षाची नोंदणी वेळेत न झाल्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक रिंगणात उतरावे लागत आहे. अनेक मोठ्या राजकीय पक्षांकडून त्यांना तिकीट देण्याची ऑफर मिळाली होती. मात्र, स्वतःच्या नीती आणि विचारसरणीशी कधीही तडजोड करणार नाही, असे शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे.
शिवदीप लांडे म्हणाले की, त्यांच्या राजकारणाचा मुख्य उद्देश जनतेची सेवा करणे आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देणे हा आहे. पोलीस सेवेत कार्यरत असताना त्यांनी बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये काम करत गुन्हेगारी आणि माफियाविरोधात कठोर पावले उचलली, यामुळेच त्यांना तरुणांमध्ये 'सिंघम' म्हणून ओळख मिळाली. आता हीच प्रतिमा घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत.
शिवदीप लांडे यांनी जमालपूर आणि अररिया या दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे, कारण या दोन्ही भागांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे आणि त्यांनी अनेक वर्षे या ठिकाणी पोलीस दलात सेवा बजावली आहे. या निर्णयाबाबत लांडे म्हणाले की, हे क्षेत्र विकासापासून खूपच दूर आहे आणि आजही जनता मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहे. त्यांच्या मते, जर जनतेने त्यांना संधी दिली, तर ते शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतील.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, अपक्ष उमेदवार म्हणूनही शिवदीप लांडे यांची लोकप्रियता त्यांना मतं मिळवून देऊ शकते. एकंदरीत, त्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे बिहारची विधानसभा निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, मात्र त्यांची निवड बिहार कॅडरमधून आयपीएस अधिकारी म्हणून झाली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.