कोल्हापूरचा पोलीस इब्रार इनामदार सेवेतून बडतर्फ
मिरजेतील बनावट नोटाप्रकरणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
मिरजेत सापडलेल्या तब्बल एक कोटींच्या बनावट नोटाप्रकरणी याचा मास्टर माईंड असलेल्या कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस नाईक इब्रार इनामदार याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याप्रकरणाची दखल घेत कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी कोल्हापूरचे अधीक्षक योगेश कुमार यांना कडक कारवाईचे निर्देश दिले हॊते. त्यानुसार कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी बनावट नोटा प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिवारी इनामदार याला बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
मिरजेत पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा खपवण्यासाठी आलेल्या सुप्रीत देसाई याला मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्यासह पथकाने अटक केली. त्याच्याकडील चौकशीत इब्रार हा मास्टर माईंड असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर इब्रारसह कोल्हापूर जिल्ह्यातील चार तसेच मुंबई येथील एकाला अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत इब्रार याच्या कोल्हापूर येथील चहा मसाल्याच्या दुकानात या नोटा छापल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये पोलिसाचा सहभाग असल्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मोटर परिवहन विभागात कार्यरत असलेला पोलीस नाईक इब्रार सय्यद आदम इनामदार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणुक) १९७९ मधील तरतुदीचा भंग करुन संशयास्पद सचोटी, संशयास्पद वर्तन, पोलीस दलाची प्रतिमा मलीन करुन कर्तव्यपरायणता न राखून पोलीस दलातील पदास अशोभनीय असे गैरवर्तन केले तसेच कायदयाचे परिपुर्ण ज्ञान असताना ही भारतीय न्याय संहिताच्या कलमांमधील तरतुदीचा भंग करुन बनावट भारतीय चलन नोटा तयार करणे, विक्री करणे, वापरणे हा गुन्हा असल्याचे माहिती असतानाही सदरचे गैरकृत्य केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील नियम २५ व २६ तसेच भारतीय संविधान १९५० मधील अनुच्छेद क्रमांक ३११ (२) (ब) नुसार व (३) अन्वये इनामदार हे देशविघातक कृत्याशी संबंधीत असल्याने, त्यांची प्राथमिक चौकशी/विभागीय चौकशी करणे लोकहिताच्या दृष्टीने उचित नसलेने व वाजवीपणे व्यवहार्य नसलेने तसेच त्यांना बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक झाले दिनांकापासुन शासकीय सेवेतुन बडतर्फ ही शिक्षा दिलेली आहे, असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.