मध्यरात्री थेट पोलीस अंमलदारावरच कोयत्याने हल्ला
पुणे : खरा पंचनामा
मध्यरात्री कामावरून घरी जात असलेल्या पोलीस अंमलदारावर दोन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना लॉ कॉलेज रोड परिसरात घडली. या हल्ल्यात पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले आहेत. अमोल काटकर (वय 42, रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत) हल्ला झालेल्या पोलीस अंमलदाराचं नाव आहे. या प्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी दुचाकीस्वारासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमोल काटकर हे पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 3 मध्ये कार्यरत असून रविवारी (5 ऑक्टोबर) रात्री 1 वाजता ते वारजे येथील कार्यालयातून दुचाकीवरून घरी परतत होते. ते कोथरूडहून कॅनॉल रोडमार्गे लॉ कॉलेज रस्त्याने जात असताना, मागून येणाऱ्या दुचाकीस्वार दोघांशी गाडी घासल्यावरून त्यांचा वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यावर हल्लेखोरांनी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे काटकर गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला सदर घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांना तत्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. सदर हल्ल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तींचे वाढते धाडस हा चिंतेचा विषय ठरत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.