"नैसर्गिक संकटात राजकारण आणू नका"
ठाणे : खरा पंचनामा
नैसर्गिक संकटाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता 'एक आपले राज्य' म्हणून सर्वांनी पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी त्यांनी ठाणे शहरातील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी पुढे जात असताना आम्ही बेरजेचे राजकारण करीत असल्याचेही ते म्हणाले.
या वेळी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी (ता. २) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. देसाई बुधवारी (ता. १) रात्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत महाआरतीला उपस्थित होते आणि गुरुवारी सकाळी त्यांनी प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला या वेळी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या आत पैसे जमा करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बळीराजाला या संकटातून सावरले पाहिजे, असे ते म्हणाले. यासंदर्भात केंद्राकडून मदत मिळवण्याचाही प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या येथे माळेगाव साखर कारखाना आहे. त्याची एक शैक्षणिक संस्था आहे. त्याचे शरद पवार अध्यक्ष आहेत. त्या सर्वसाधारण सभेत एक ठराव केलेला आहे, तिथे चौकोनी संचालक बोर्ड निवडून येते. त्याचा अध्यक्ष हा त्या संस्थेचा उपाध्यक्ष असतो. मी माळेगाव साखर कारखान्याचा अध्यक्ष असल्यामुळे मी तिथे उपाध्यक्ष आहे. आम्हाला तिथली वार्षिक संस्थेची सभा घ्यायची आहे. त्याबद्दलचे काही प्रश्न होते, बैठक घ्यायची होती. त्यानुसार बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ३१ जानेवारी २०२६च्या आत जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका या निवडणुका घ्याव्या लागणार असल्याने कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, की देशाचे गृहमंत्री अमित शहा ५ ऑक्टोबरला राज्यात येत असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रात्री त्यांची भेट घेतील. पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात त्यांना यापूर्वीच माहिती देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.