मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या NSG कमांडोला गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी NSG कमांडोला गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही संयुक्त कारवाई राजस्थान एटीएस आणि अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सने (ANTF) केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव बजरंग सिंग आहे.
एटीएसच्या माहितीनुसार, बजरंग तेलंगणा आणि ओडिशा मधून गांजाची तस्करी करत होता आणि राजस्थानच्या विविध भागात त्याचा पुरवठा करत असे. त्याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते.
एटीएसचे महानिरीक्षक विकास कुमार यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बजरंग सिंग मूळचा सिकर जिह्यातील फतेहपूरचा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून एटीएस त्याचा शोध घेत होती. बुधवारी त्याचा रतनगड (चुरू जिल्हा) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २०० किलो गांजा देखील जप्त करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील बजरंगला गांजा तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. २०२३ मध्ये हैदराबादमध्ये १०० किलो गांजा तस्करी करताना त्याला अटक झाली होती, मात्र नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.
विकास कुमार यांनी सांगितले की, राजस्थान एटीएस आणि ANTF ने 'ऑपरेशन गंजनेय' यशस्वीरित्या पार पाडले, ज्यामुळे बजरंग सिंगला अटक करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.