Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोणार सरोवरात मासे दिसून आल्याने खळबळ, जैवविविधतेला धोका

लोणार सरोवरात मासे दिसून आल्याने खळबळ, जैवविविधतेला धोका

भंडारा : खरा पंचनामा

जगप्रसिद्ध उल्कापातातून निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर हे आपल्या दुर्मीळ जैवविविधतेसाठी ओळखले जाते. मात्र, अलीकडेच या सरोवरात मोठ्या प्रमाणावर मासे दिसून आल्याने प्रशासन आणि पर्यावरणतज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे.

केवळ महिनाभरापूर्वीच सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी 'सरोवरात मासे असूच शकत नाहीत' असे ठाम विधान केले होते. मात्र, आता पारदर्शक झालेल्या पाण्यात विविध आकारांचे मासे फिरताना स्पष्ट दिसत असल्याने या वक्तव्यावर वाद निर्माण झाला आहे. दर मंगळवारी कमळजा माता मंदिराच्या दर्शनासाठी सरोवरात येणाऱ्या स्थानिक भक्तांनी पाण्यात मासे दिसल्याचा दावा केला असून, काहींनी त्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे कॅमेरात टिपली आहेत. 'आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाण्यात मासे पाहिले,' असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. परिणामी, प्रशासनाचे 'सरोवर मासेविरहित आहे' हे विधान आता संशयाच्या भोवर्यात सापडले आहे. लोणार सरोवराचे पाणी समुद्रापेक्षाही अधिक खारट असल्याने पूर्वी येथे कोणतेही मासे टिकू शकत नव्हते. सरोवराचा पीएच स्तर १० पर्यंत असल्याने जीवसृष्टीस प्रतिकूल वातावरण निर्माण होत असे. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यांद्वारे गोडे पाणी आणि सांडपाणी सरोवरात मिसळल्याने खारटपणा कमी झाला. परिणामी, पाण्याचा पीएच स्तर घटल्याने काही मासे किनार्याजवळ टिकू शकत आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

माशांसह सरोवराच्या काठावर सापही दिसू लागले आहेत. काही साप हे माशांना गिळताना दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अलीकडेच वनविभागाने कमळजा माता मंदिराच्या परिसरातून एक अजगर पकडून सुरक्षित ठिकाणी हलविला होता. या घटनांमुळे लोणार सरोवरातील पर्यावरणीय समतोल धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दर मंगळवारी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे म्हणणे आहे की, वाढत्या पाण्यामुळे कमळजा देवी मंदिरात जवळपास साडेतीन फूट पाणी साचले असून मंदिर थोडे झुकल्यासारखे दिसत आहे. भक्तांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 'कमळजा माता हे आमचे श्रद्धास्थान आहे, प्रशासनाने मंदिर सुरक्षित ठेवावे,' असे स्थानिकांचे आवाहन आहे.

पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, 'सरोवराच्या खारटपणात घट झाल्यामुळे जैवविविधतेत तात्पुरते बदल दिसत आहेत. मात्र, ही स्थिती दीर्घकाळ टिकल्यास लोणार सरोवराचे नैसर्गिक संतुलन धोक्यात येऊ शकते.' लोणार सरोवरात माशांचे दिसणे हे नैसर्गिक बदलाचे संकेत असू शकतात, मात्र या घटनेमुळे प्रशासनाचे दावे प्रश्नांकित झाले आहेत. आता वनविभाग, भूगर्भशास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञांनी मिळून सखोल तपासणी करून उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.