"भाजपा आणि संघ भाषेचं विष पसरवत आहेत"
मुंबई : खरा पंचनामा
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच मुंबईतील लोकलमध्ये मराठी बोलला नाही म्हणून एका टोळक्याने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली, त्या तणावातून एका मुलाने आपलं जीवन संपवल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेवरून भाजपा आणि ठाकरे गट व मनसेमध्ये राजकारण तापलं आहे.
या संदर्भात बोलताना आज उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि संघावर जोरदार टीका केली. मागाठाण्यातील शिंदे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला. 'भाजपा आणि संघ भाषेचं विष पसरवत आहेत', असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
"अनेकजण परत येत आहेत, थोडक्यात काय तर हळहळू आता सर्वांच्या लक्षात यायला लागलं आहे की भाजपा आणि गद्दार किती ढोंगी आहेत. पण तरीही ही लढाई सोपी नाही. त्यामुळे तुम्ही (कार्यकर्ते) आता डोळे उघडे ठेऊन सगळीकडे पाहा. भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. ज्या पद्धतीने भाजपाने पक्ष फोडले, त्याच पद्धतीने ते आता घरं देखील फोडण्याचा प्रयत्न करत आहेत", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
"भाजपाचा हिंदुत्वाचा फुगा फुटलेला आहे. पालघरमध्ये जे साधू हत्याकांड झालं ती घटना दुर्देवी घटना होती. त्या घटनेचं कोणीही समर्थन करत नाही आणि करणारही नाही. ती घटना घडली तेव्हा भाजपाने ज्याच्यावर आरोप केले होते, त्याच व्यक्तीला भाजपाने पक्ष प्रवेश दिला. भाजपाला वाटलं की पक्षात प्रवेश दिला म्हणजे आपलं पाप लपून जाईल. मात्र, पाप लपलं नाही आणि चव्हाट्यावर आलं. त्यानंतर भाजपाने घाईघाईत पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली, म्हणजे काय तर भाजपाचं हिंदुत्वाचं ढोंग फुटलं आहे", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
"आता भाजपावाले काय करत आहेत तर भाषिक प्रांतवाद पेटवत आहेत. काल-परवा एक दुर्देवी घटना घडली, ती घटना घडायला नको होती. भाषेवरून कोणाला मारा, अशी आपली मागणी नाही. आता मागाठाणेमध्ये कोण बोललं होतं की आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, मग अशा व्यक्तींकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार? आता संघाचे जोशी देखील घाटकोपरमध्ये येऊन बोलून गेले होते की मातृभाषा गुजराती आहे. म्हणजे हे जे विष आहे ते भाजपा आणि संघ पसरवत आहे आणि त्याचं खापर ते आपल्यावर फोडत आहेत", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि संघावर जोरदार टीका केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.