मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येणार, काही जिल्ह्याना यलो अलर्ट
पुणे : खरा पंचनामा
राज्यात पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मागील आठ दिवसांपासून जळगांव जिल्ह्यात सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
मध्य महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी थंडीचा पारा ९ अंशावर नोंदविल्यामुळे जळगांवकर चांगलेच गारठले आहे. जळगांवसह नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातही हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहे. तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यातही किमान तापमान १० ते ११ अंशापर्यंत खाली आल्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे.
पुढील ४८ तासांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामध्ये जळगांव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहिल्यानगर, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येणार असून, या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट दिला आहे. तर पुढील आठवडाभर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार असून, थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.