मुलाच्या व्यवहाराने पिता अडचणीत, अजित पवारांना चहुबाजूने घेरलं
मुख्यमंत्री फडणवीस 'गंभीर', चौकशीचेही आदेश !
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव घेतलं जात असल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत पार्थ पवार यांची प्रतिक्रिया समोर आली असून आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणातील जे मुद्दे समोर आले आहेत ते गंभीर असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी होणार असल्याचं स्पष्ट केल्याने अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने हा व्यवहार केला आहे. या कंपनीत पार्थ पवार यांचे मामेभाऊ आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे चुलत बंधू दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांचे पार्टनर आहे. या कंपनीने ही जमीन कमी किमतीत घेतलं. इतक्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर सरकारी धोरणाचा पुरेपूर फायदा उठवत या व्यवहारात तब्बल 25 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करण्यात आली आहे. फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे. यामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक पाहता या व्यवहाराची फाईल इतक्या वेगाने कशी फिरली, यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी आणि अतिउच्चभ्रू वस्तीत असणारी जमीन सगळे सरकारी नियम धाब्यावर बसवून खरेदी करण्यात आली असल्याने पार्थ पवार आणि पर्यायी अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावरून आता विरोधी पक्षातील नेत्यांनी अजित पवारांना लक्ष करत जोरदार टीका केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.