महिला तहसीलदार रजेवर; भाजप आमदाराने त्यांच्या खुर्चीला घातला हार!
नायगाव : खरा पंचनामा
येथे भाजप आमदार राजेश पवार यांनी ना अनुपस्थित असलेल्या महिला तहसीलदारांच्या खुर्चीला पुष्पमाला अर्पण करून केलेल्या अपमानास्पद कृतीची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड या ३१ ऑक्टोबर रोजी सासऱ्यांचे निधन झाल्याने रजेवर होत्या. त्यांच्या अनुपस्थितीत आमदार पवार यांनी कार्यालयात भेट देऊन त्यांच्या खुर्चीवर पुष्पमाला ठेवली. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रजेची माहिती दिल्यानंतरही ही कृती केल्याने 'सार्वजनिक अपमान' केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल दत्ता जिंगळेकर यांनी केला होता. त्यांनी राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.
तक्रारीत, महिला अधिकारी तसेच अनुसूचित जातीच्या अधिकारीवर्गाचा सन्मान धोक्यात आणणारा हा प्रकार असून, तो अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या कलम ३ (१) (आर) (एस) नुसार दंडनीय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच शासन निर्णय व महिला आयोग स्थापन अधिनियम १९९५नुसारही हा प्रकार गंभीर मानला जातो, असेही जिंगळेकर यांनी अधोरेखित केले आहे.
तहसीलदार गायकवाड यांना झालेल्या मानसिक व सामाजिक त्रासाची भरपाई म्हणून योग्य सरकारी मान-सन्मानासह बढती विचारात घ्यावी, लोकप्रतिनिधींना महिला व अनुसूचित जाती-जमाती अधिकारी यांच्याशी वागणुकीबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, तसेच व्हिडिओ क्लिपची तांत्रिक चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. जिंगळेकर यांच्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने सखोल चौकशीचे आदेश जारी करत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांना पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.