माजी गृहमंत्र्यांच्या मुलाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दिला तडकाफडकी राजीनामा
नागपूर : खरा पंचनामा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी आज तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला.
तब्येतीच्या कारणामुळे सहा महिने आराम करायचा, पक्षाला वेळ देता येत नसल्यामुळे आपण राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तब्येत चांगली झाल्यावर सहा महिन्यानंतर काय करणार अशी विचारणा केली असता त्यांनी त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ असे सांगून त्यांनी सर्वांसाठी आपली दारे खुली ठेवली असल्याचे दिसून येते. आता ते दादांच्या राष्ट्रवादीत जातात की भाजपचे कमळ हाती धरतात याची उत्सुकात सर्वांना लागली आहे.
सलील देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. विदर्भाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मागची जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी जिंकली होती. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्या ऐवजी सलील देशमुख यांनी निवडणूक लढली होती. मात्र ते पराभूत झाले. तीन महिन्यांपूर्वी त्यांची तब्येत अचानक खराब झाली होती. सुमारे महिनाभर ते इस्पितळात दाखल होते. या दरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्पितळात जाऊन त्यांची भेट घेतली होती. अजित दादा यांच्यासोबत देशमुख कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध आहेत. हे बघता ते दादांच्या राष्ट्रवादीत जातील असा तर्क लावला जात आहे.
सध्या नगर पालिका आणि नगर परिषदेची धामधूम नागपूर जिल्ह्यात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही बैठकांना सलील देशमुख उपस्थित होते. काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्या नाही तर आम्ही समविचारी पक्षासोबत युती करू असे पत्रक त्यांनी काढले होते. आठ दिवसांपासून सक्रिय असताना अचानक राजीनामा देऊन देशमुख यांनी सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे त्यांनी राजीनामा नेमक्या कोणत्या कारणासाठी दिला आणि कुठल्या पक्षात ते जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.