बिहार निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा सुपडासाफ !
पाटणा : खरा पंचनामा
एनडीएचा बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (एनसीपी अजित पवार गट) मात्र मोठा धक्का बसला आहे.
बिहारमध्ये स्वबळावर लढलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेने पूर्णपणे नाकारले असून, एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही. पक्षाने उतरवलेल्या 15 उमेदवारांपैकी 13 जणांच्या मतांची संख्या इतकी कमी आहे की, त्यांचे डिपॉझिट (अनामत रक्कम) जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिहारमध्ये एनडीएने (भाजप + जेडीयू इतर) 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवताना दिसत आहेत. दुसरीकडे, महागठबंधनला अवघ्या 48-50 जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बिहारमध्ये स्वतंत्रपणे उमेदवार उतरवून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्याची रणनीती आखली होती, पण ती पूर्णपणे फसली आहे. पक्ष फुटीपूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झारखंड, गोवा, गुजरात, केरळसह अनेक राज्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकद होती. बिहारमध्ये तारिक अन्वरांसारखे नेते होते. मात्र, फूट पल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आणि आता बिहारमधील हा प्रयोगही अपयशी ठरला.
अनेक उमेदवारांना 500 मतांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. निवडणूक नियमांनुसार, मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या 1/6 भाग इतकी मतं न मिळाल्यास डिपॉझिट जप्त होते. बिहारमध्ये राष्ट्रवादीच्या बहुतांश उमेदवारांची स्थिती हीच आहे. अजित पवारांनी एनडीए सोबत राहण्याऐवजी बिहारमध्ये स्वतंत्र लढत देण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळेल. मात्र, हा डाव उलटाच पडला आणि महाराष्ट्राबाहेर पक्षाची विश्वासार्हता आणखी कमी झाली.
बिहारच्या या पराभवामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय विस्ताराच्या स्वप्नाला मोठा ब्रेक लागला आहे. आता महाराष्ट्रातही विरोधकांना अजित पवारांना चिमटे काढण्याची नवी संधी मिळाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.