'बेटी पढी पर बची नहीं...'
महिला डॉक्टर आत्महत्येनंतर मुंबईसह राज्यात डॉक्टर संघटना आक्रमक
मुंबई : खरा पंचनामा
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर या घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन न्याय मिळावा यासाठी आज राज्यभरातील सर्व प्रमुख डॉक्टर संघटना आंदोलन करत आहे.
यामुळे राज्यातील रुग्णसेवा ठप्प झाली आहे. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे पालिका आणि शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा सुरुळीत राहावी यासाठी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक सेवा देत आहेत.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉक्टर महिलेने 23 ऑक्टोबर रोजी फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले. आत्महत्येपूर्वी डॉक्टर महिलेने स्वतःच्या तळहातावर सुसाईट नोट लिहून ठेवली होती. यात त्यांनी पीएसआय गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर यांनी शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आरोप केला. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र डॉक्टर महिलेवर पोलीस प्रशासन आणि एका माजी खासदाराकडून वैद्यकीय अहवाल बदलून देण्यासाठी दबाव टाकला जात होता असाही आरोप आहे.
डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून केला जात आहे. त्यामुळेच आज राज्यभरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी काम बंद आंदोलन केले आहे. मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहे. बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे बंद करण्यात आला असून डॉक्टर नायर रुग्णालयाच्या परिसरात आंदोलन करत आहेत.
नायर रुग्णालयात निवासी डॉक्टर आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले. "बेटी पढी, पर बची नहीं," "नो सेफ्टी, नो सर्विस" अशा घोषणा देत, हातात पोस्टर घेत डॉक्टर आणि एमडी करणारे विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत.
नायर रुग्णालयातील मार्ड संघटनेकडून आंदोलन करण्यात येत असून डॉक्टर महिलेला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. डॉक्टर आंदोलकांची मागणी आहे की, मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबाला 5 कोटी रुपयांची मदत, जलदगती न्यायालयात सुनावणी करावी आणि डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मार्ड संघटनेकडून काम बंद आंदोलन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद करण्यात आली. बंद पुकारल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.