'लग्न कर किंवा मला 2 लाख दे, नाहीतर...'
कोल्हापूरच्या तरुणावर अत्याचार करणाऱ्या महिला 'वकिलाविरोधात' आणखी एक गुन्हा
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात कोथरूडमध्ये कोल्हापूरच्या पुरुषावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात नाव आलेल्या एका महिला वकिलावर आता आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मुंढवा पोलिसांनी या वकिलाविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नवरा-बायकोमध्ये सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत या महिलेने फिर्यादीशी जवळीक साधली आणि मदत करण्याच्या कारणावरून त्याच्याकडून थेट 2 लाख रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्या महिलेचे कॉल रेकॉर्ड, मेसेज आणि इतर माहिती तपासली जात आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील कोर्ट परिसरातही मोठी खळबळ उडाली आहे.
मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याच्या पत्नीसोबत चालू असलेल्या कौटुंबिक वादाच्या प्रकरणात ही महिला वकील मदत करते असे सांगत होती. मी हायकोर्टात वकील आहे, तुला केस लढायला मदत करेन असे सांगत तिने फिर्यादीशी जवळीक वाढवली. फिर्यादीचे वय 38 वर्षे असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपानुसार, जवळीक साधल्यानंतर महिलेने त्याच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर काही अश्लील फोटो दाखवून त्याला ब्लॅकमेल केले. लाखोंची खंडणी मागितल्यामुळे फिर्यादीला संशय आला आणि त्याने थेट मुंढवा पोलिसांकडे तक्रार केली.
विशेष म्हणजे, या महिला वकिलावर यापूर्वीच कोथरूड पोलिसात पुरुषावर अत्याचार करून व्हिडिओ आणि फोटोच्या मदतीने ब्लॅकमेल केल्याचा गुन्हा दाखल आहे. आता त्याच व्यक्तीने दुसऱ्या पोलिस स्टेशनमध्येही तक्रार दिल्याने तिच्यावर सलग दोन ठिकाणी गुन्हे नोंदवले गेले आहेत. पोलिसांनी महिलेवर तपासासाठी नोटीस बजावली असून लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती दिली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास पुणे पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.