पार्थ पवारांना बाहरिनला सेटल करणार? 'हा माणूस देशात परतलाच नाही तर...'
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील भूखंड प्रकरणात पोलीस यंत्रणांनीसुद्धा मोठी कारवाई करत जमीन ताब्यात घेण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नीचं हत्यार वापरणाऱ्या शीतल तेजवानीला अटक केली. ज्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं असून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही महत्त्वाचे प्रश्न अजित पवार आणि पार्थ पवार यांना अनुसरून उपस्थित केले आहेत.
गुरुवार, 4 डिसेंबर 2025 रोजी माध्यमांशी संवाद साधताना दमानिया यांनी काही असे प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळं या प्रकरणाला एक नवी आणि अनपेक्षित कलाटणी मिळू शकते. सदर प्रकरणी चौकशी सुरू असताना आणि पार्थ पवार बाहरिनला गेले अशी माहिती मिळतेय असल्याचं सांगत ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचं दमानिया म्हणाल्या. 'इतक्या मोठ्या गुन्ह्यात नाव असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली जाते? हा माणूस परत देशात आला नाही तर, या प्रकरणातील पूर्ण चौकशीची प्रक्रिया थांबणार का? हा अतिशय गंभीर प्रश्न आहे', असं म्हणत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं.
'त्याला बाहरिनला सेटल करतील, भारतात आणणारच नाहीत आणि यापुढील चौकशी सगळी होणारच नाही अशी परिस्थिती आहे का? असे असंख्य प्रश्न पडतात' असं म्हणत दमानिया यांनी परिस्थितीवर संताप व्यक्त केला. सध्या अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या विवाह सोहळ्यासाठी पवार कुटुंबीय. बाहरिनला रवाना होत असल्यामुळं दमानियांनी ताशेरे ओढले. यावेळी, खारगे समितीच्या अहवालासाठी महिन्याभराची मुदतवाढ देण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. '7 तारखेला अहवाल देणं अपेक्षित होतं. त्यांनाही वाढीव महिन्याभराची मुदत मिळाली आहे. हे चाललंय काय?' असा सवाल दमानियांनी उपस्थित केला.
'एखाद्या सामान्य माणसाशी हे झालं असतं तर अक्षरशः आपल्याला चिरडलं असतं. पण, पार्थ पवार जो उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे त्याच्यावर मात्र ही कारवाई होताना आपल्याला दिसत नाही. हे सर्व भयानक असून मी हा मुद्दा उचलून धरणार आहे' अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. खारगे समितीनं जितका तपास झाला आहे तितका अहवाल सादर करावा असा सूर आळवत, त्यांनी 'सदर भूखंड ही सरकारची म्हणजे जनतेची जमीन होती. त्यात नेमकं काय सुरुय, कोणाची आणि कशाबद्दल चौकशी होतेय हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला पूर्णपणे आहे' ही बाबसुद्धा अधोरेखित केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.