पाच दिवस बेपत्ता झालेले पोलीस निखिल रणदिवे सापडले!
दौंड : खरा पंचनामा
व्हॉट्सअॅप स्टेटसवर आत्महत्या करण्याबाबत भावनिक संदेश आणि मुलीचा फोटो पोस्ट करुन बेपत्ता झालेल्या पोलिसाच्या बाबतीत मोठी अपडेट समोर आली आहे. यवत पोलिस ठाण्या अंतर्गत केडगाव पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलिस नाईक निखिल रणदिवे अचानक बेपत्ता झाल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती.
तब्बल पाच दिवस बेपत्ता राहिल्यानंतर रणदिवे काल मध्यरात्री सुखरुप घरी परतले. त्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
निखिल रणदिवे यांनी स्टेटसमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वागणुकीबाबत गंभीर आरोप केले होते. गेल्या वर्षभरापासून वरिष्ठांचा सततचा मानसिक छळ, मनमानी आदेश, वारंवार दूरस्थ ठिकाणी ड्युटी, आजारी मुलीला वेळ न देता येणे आणि नुकत्याच झालेल्या शिक्रापूर बदलीतील रिलीव्हिंगमध्ये झालेला विलंब यामुळे प्रचंड तणावात असल्याचे त्यांनी स्टेटसवर लिहिले होते.
या पोस्टनंतर त्यांचा मोबाईल बंद झाला आणि ते बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यवत, शिक्रापूर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली होती.
निखिल रणदिवे काल मध्यरात्री सुखरुप घरी परतल्याची माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी दिली. रणदिवे परतल्याने पोलिस दल व कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मानसिक तणाव आणि वरिष्ठांविरुद्धचे आरोप यावर आता पोलिस दलाकडून स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता आहे.
पीआय नारायण देशमुख यांच्याविरुद्ध यापूर्वीही काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या कारभाराबाबत ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. आता याबाबत काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.