राज्याचे नवे पोलीस महासंचालक होण्याचा सदानंद दाते यांचा मार्ग मोकळा
मूळ महाराष्ट्र केडरमध्ये परत पाठविण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेट समितीची मान्यता
मुंबई : खरा पंचनामा
'राष्ट्रीय तपास यंत्रणे'चे (एनआयए) विद्यमान महासंचालक सदानंद दाते यांना त्यांच्या मूळ महाराष्ट्र केडरमध्ये परत पाठविण्याच्या प्रस्तावातील केंद्रीय कॅबिनेट समितीने मान्यता दिली आहे. एनआयए प्रमुख म्हणून त्यांच्या मुदतपूर्व प्रत्यावर्तन प्रस्ताव तात्काळ अंमलात आणण्याच्या दिशेने मंजूर करण्यात आल्याने आता १ जानेवारी २०२६ पासून राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनआयएचे प्रमुख म्हणून दाते यांना केंद्र सरकार मुक्त करील का, याबाबत संदिग्धता होती.
विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला यांना राज्य शासनाने दिलेला वाढीव दोन वर्षांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. नव्या महासंचालकांची नियुक्ती करण्यासाठी राज्य शासनाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला यादी पाठविली असून त्यात सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणून दाते यांच्या नावाचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून तीन नावांची शिफारस केली जाईल. दाते यांना मूळ राज्यात परत पाठविण्याच्या प्रस्तावाची राज्य शासन प्रतीक्षा करीत होते. आता ही अडचण दूर झाल्यामुळे दाते यांची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे गृहखात्यातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
१९९० च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. दाते हे अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार दाते हे सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाला सात अधिकाऱ्यांची नावे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये दाते यांच्यासह महासंचालक (विधी आणि तांत्रिक) संजय वर्मा, गृहरक्षक दलाचे समादेशक रितेश कुमार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजीवकुमार सिंघल, महाराष्ट्र गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या महासंचालक अर्चना त्यागी, नागरी संरक्षण दलाचे महासंचालक संजीव कुमार आणि रेल्वेचे महासंचालक प्रशांत बुरडे यांचा समावेश आहे.
यापैकी तीन नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून राज्य शासनाला पाठविली जातात. त्यापैकी एका नावावर राज्य शासनाला शिक्कामोर्तब करता येते. त्यामुळे राज्य शासनाकडून दाते यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. दाते हे डिसेंबर २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार असले तरी त्यांची नियुक्ती झाली तर त्यांना दोन वर्षांचा कालावधी मिळू शकेल. दाते यांनी मुंबई पोलिस दलात गुन्हे शाखा तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली आहे.
राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते. तेथे असतानाच त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली. अल्पावधीतच ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख बनले. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु होता. याशिवाय मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त, छत्तीसगढ येथे केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक हे पदही त्यांनी भूषविले. त्याआधी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे विभागात ते अधीक्षक होते. ते
थेच त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी बढती मिळाली. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईत मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली. त्याच काळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी जिवाची पर्वा न करता दहशतवाद्यांना रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या 'फोर्सवन'ची जबाबदारी त्यांनी स्वतःहून मागून घेतली. फोर्सवनचे ते पहिले प्रमुख होते. मुंबई पोलीस दलात दहशतवादविरोधी कक्ष स्थापन करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.