ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस आयकार्ड
धक्कादायक प्रकाराने खळबळ
अंबरनाथ : खरा पंचनामा
राज्यातील 23 नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान सुरू आहे. अंबरनाथ नगरपरिषदेसाठीही मतदान सुरू आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी गडबड गोंधळ झालेला पाहायला मिळत आहे. सकाळीच 208 हून बोगस मतदार पकडल्याची घटना घडली.
या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केलेली असतानाच ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्याकडेच बोगस आयकार्ड असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर काही ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे.
अंबरनाथच्या ग्रीन सिटी, प्रभाग क्रमांक 29 मध्ये हा गोंधळ पाहायला मिळाला आहे. ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस आयकार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांना सर्वच उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ झाला. या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने दुसरं मशीन मागवण्यात आलं होतं. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. जे कर्मचारी मशीन घेऊन आले त्यांच्या आयकार्डवर फोटो आणि नाव तसंच सही, शिक्का देखील नव्हता. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. तेव्हा निवडणूक अधिकाऱ्याची चांगलीच बोबडी वळली होती.
अंबरनाथ 15 नंबर वॉर्डमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. वातावरण चांगलंच तापल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. परिसरात तणावपूर्ण वातावरण पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
दरम्यान, बोगस मतदार प्रकरणी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मतदारांचे ओळखपत्र आणि यादी पोलिसांनी तपासून संबंधित शिवसेना पदाधिकारी आणि संबंधित लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रदीप पाटील यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.