दंडाची कारवाई केली म्हणून भररस्त्यात ट्रॅफिक हवालदाराला मारहाण
पुणे : खरा पंचनामा
सिंहगड रोडवर धायरी फाटा चौकात मंगळवारी संध्याकाळी ट्रॅफिक पोलिस ड्युटीवर होते. तेव्हा एक दुचाकी थेट ट्रिपल सीटवर येताना दिसली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे गाडी अडवली आणि दंडाची कारवाई सुरू केली. पण एवढ्यातच तीन तरुण भडकले.
"आमच्यावर दंड कशासाठी?" असं म्हणत त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. बघता बघता वाद इतका वाढला की थेट हात उचलण्यापर्यंत मजल गेली. तिघांपैकी एकाने पोलीस हवालदाराच्या कानशिलात मारली, तर बाकी दोघांनी आरडाओरड करत त्यांचा गणवेश ओढून फाडला. हे सगळं भर चौकात, लोकांसमोर घडलं.
जखमी झालेले पोलीस हवालदार राजेंद्र सेंगर हे सिंहगड रोड वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. या प्रकरणात नहे पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. विशेष म्हणजे हे तिघेही आधीपासून पोलीस रेकॉर्डवर असलेले सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यात गेल्या काही दिवसांत ट्रॅफिक पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकार वाढताना दिसत आहेत. हडपसर, पुणे स्टेशननंतर आता धायरीतही असा प्रकार घडल्यामुळे पोलीस दल सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ट्रॅफिक पोलिसांना बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून कारवाईदरम्यान नेमकं काय घडलं हे रेकॉर्डमध्ये राहील.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.