११ शासकीय रुग्णालयांतील रेडिओलॉजी विभागाचा पीपीपी तत्त्वावर विकास?
सांगली सिव्हिल, कोल्हापूरच्या सीपीआरचा समावेश
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील ११ रुग्णालयांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रेडिओलॉजी सुविधा विकसित करण्याचा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) घेतलेला निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रेडिओलॉजी केंद्रांचा आराखडा, वित्तपुरवठा, उभारणी, सुसज्जीकरण, संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी स्पंदन डायग्नोस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेडकडे या खाजगी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.
रेडिओलॉजीसारखा मलाईदार विभाग खाजगी संस्थेच्या घषात घालण्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक वरिष्ठ अध्यापक, निवृत्त डॉक्टर तसेच 'मार्ड' ने विरोध केला आहे. यात रेडिओलॉजीच्या डॉक्टरांना शिकण्यास मिळणार नाही, असा प्रमुख मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या मोक्याच्या जागा तसेच रेडिमेड पेशंट देऊन शासन नेमके कोणाचे हित साधत आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या ग्रांट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे रुग्णालयात आधीच रेडिओलॉजी विभाग व आवश्यक ती मशिन कार्यरत असताना तेथे नव्याने खाजगी संस्थेला रेडिओलॉजी विभाग चालवायला कोणत्या 'अर्थपूर्ण' कारणांसाठी चालवायला दिला जात आहे, असा सवाल जे. जे. मधील वरिष्ठ अध्यापकांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रेडिओलॉजी सुविधा विकसित करणे, चालविणे व देखभाल करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि स्पंदन डायग्नोस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात नुकताच करार झाला आहे.
या करारानुसार मुंबई क्लस्टर अंतर्गत राज्यातील ११ रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजी केंद्रांचा आराखडा, वित्तपुरवठा, उभारणी, सुसज्जीकरण, संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी स्पंदनकडे सोपविण्यात आला आहे. तसेच प्रत्येक केंद्रात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी रेडिओलॉजी प्रयोगशाळा उपलब्ध करणे बंधनकारक असणार आहे. करारानुसार पैसे भरणाऱ्या रुग्णांकडून थेट शुल्क वसूल करण्याचा अधिकार कंत्राटदाराला राहणार आहे. तसेच कराराच्या अंमलबजावणीसाठी अधिष्ठाते, डीएमईआर, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्पंदन यांच्या प्रतिनिधींची समन्वय समिती गठित करण्यात येणार आहे तिच्या अध्यक्षपदी डीएमईआरचे आयुक्त असतील. मुंबईतील जे.जे. रुग्णालय, जी. टी रुग्णालय, कामा रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, धुळ्यातील भाऊसाहेब हिरे, छत्रपती संभाजी नगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सांगलीमधील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर मधील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि पुण्यातील बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रेडिओलॉजी विभाग उभारण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.