भाजपला धक्का; एकाच कुटुंबातील ६ भाजप उमेदवारांचा दारुण पराभव
नांदेड : खरा पंचनामा
नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. एकाच कुटुंबातील सहा उमेदवारांना मैदानात उतरवणाऱ्या भाजपच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामुळे जनतेने घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचे चित्र दिसते आहे.
लोहा नगरपरिषदेच्या एकूण जागांवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने भाजपचा पूर्णपणे धुवा उडवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष साजरा केला, फटाके फोडले आणि गुलाल उधळला.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या शिवसेने आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. भाजपला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. या निकालाकडे आमदार चिखलीकर यांच्यासाठी मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकीकडे लोहा नगरपरिषद राष्ट्रवादीकडे कायम राहिल्याने समाधान, तर दुसरीकडे कंधारमध्ये पराभवामुळे काहीशी निराशा.
भाजपने या निवडणुकीत सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली होती. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तसेच पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना (प्रभाग ७ अ) मधून, भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना (प्रभाग क्रमांक १ अ) मधून, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी (प्रभाग ८ अ) मधून, मेव्हणा युवराज वसंतराव वाघमारे (प्रभाग क्रमांक ७ ब) मधून, भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे (प्रभाग क्रमांक ३) मधून उमेदवारी देण्यात आली होती.
या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपच्या स्थानिक राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. घराणेशाहीविरोधी नारा देणाऱ्या भाजपलाच जनतेने धडा शिकवल्याचे बोलले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.