"राजकीय गरज म्हणून जाहीर केल्या अनेक योजना; आता पूर्ण करणं कठीण"
भाजप मंत्र्याची कबुली
भोपाळ : खरा पंचनामा
राजकीय गरज होती म्हणून आम्ही अनेक सरकारी योजना जाहीर केल्या, मात्र आता त्या पूर्ण करणं कठीण आहे, असं विधान मध्यप्रदेशमधील भाजपाचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. भोपाळमधील एका बैठकीत बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.
त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसने त्यांच्या विधानानंतर भाजपावर जोरदार टीकाही केली आहे.
भोपाळ येथे आयोजित बैठकीत बोलताना मंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले, "यापूर्वी अनेक योजनांच्या घोषणा राजकीय गरजेतून करण्यात आल्या. मात्र, आता त्या घोषणांची अंमलबजावणी करणे मोठे आव्हान आहे. शहरी विकासाशी संबंधित अनेक योजना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेशा निधीची आवश्यकता आहे. मात्र, त्या प्रमाणात निधी मिळत नाही."
ते म्हणाले, "शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यासोबतच नागरिक सुविधांची मागणीही सातत्याने वाढत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, घरे आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांची पूर्तता करणे हे राज्य सरकारचे प्राधान्य आहे. राज्याकडे असलेल्या संसाधनांच्या जोरावर या योजना पूर्ण करणे सोपे नाही", असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानानंतर काँग्रेसने भाजप सरकारवर थेट निशाणा साधला आहे. "भाजप सरकार मोठमोठी आश्वासनं आणि घोषणा करून सत्तेत आले, मात्र आता जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. मंत्र्यांच्या वक्तव्यावरून सरकार मूलभूत सुविधा देण्यातही असमर्थ असल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकीच्या काळात करण्यात आलेल्या घोषणा आणि प्रत्यक्ष परिस्थितीत मोठा फरक असतो, हे पुन्हा अधोरेखित झालं आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अभिनव बारोलिया यांनी केली.
महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेसच्या या टीकेला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं. "काँग्रेस विनाकारण राजकारण करत आहे. भाजप सरकारमध्ये एकही जनकल्याणकारी योजना बंद करण्यात आलेली नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करत", असं भाजपचे प्रवक्ते अजय यादव म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.