Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यात बंडू आंदेकरने घोषणा देत भरला अर्ज; लक्ष्मी अन् सोनालीही निवडणूक रिंगणात

पुण्यात बंडू आंदेकरने घोषणा देत भरला अर्ज; लक्ष्मी अन् सोनालीही निवडणूक रिंगणात

पुणे : खरा पंचनामा

कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी शनिवारी पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल दाखल केला. पोलीस संरक्षणात, तोंडावर बुरखा घालून आंदेकरला निवडणूक कार्यालयात आणण्यात आले होते.

यावेळी प्रसार माध्यमांच्या कॅमेरांसमोर घोषणाबाजी करत त्याने चमकोरिगी करण्याचा प्रयत्न केला. बंडू आंदेकरशिवाय सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनीही पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरला.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाने त्याच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणूक लढण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे. पोलीस बंदोबस्तातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

पुणे महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकीत आंदेकर कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी संबंधित राहिलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार की ते अपक्ष लढणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं. आंदेकर कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसही सकारात्मक असल्याची चर्चा होती. पण शनिवारी अर्ज भरताना तिघांनाही राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिला नव्हता. त्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.

प्रसार माध्यमांच्या कॅमेरांसमोर घोषणाबाजी करत बंडू आंदेकरने चमकोरिगी करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक कार्यालयाच्या मुख्य गेटमधून आत येताच नेकी का काम आंदेकर का नाम अशा घोषणांना बंडू आंदेकरने सुरुवात केली. बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय, मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही, असे म्हणत त्याने सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत, वनराज आंदेकर जिंदाबाद अशाही घोषणा त्याने यावेळी दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.