माधवनगर येथील जबरी चोरीप्रकरणी कोल्हापूरच्या सराईत गुन्हेगाराला अटक
1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
माधवनगर येथे बँकेत पैसे काढायला जायचे असल्याचे सांगत दुचाकीवरून नेऊन एकाकडील दागिने जबरदस्तीने नेणाऱ्या कोल्हापूर येथील सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून दुचाकी, दागिने असा 1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.
दस्तगीर गुलाब शेख (वय ४४, रा. सदर बझार, शाहू कॉलनी, कोल्हापुर ता. करवीर, जि. कोल्हापुर,) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 27 जानेवारी रोजी माधवनगर येथे विनायक जाधव यांना एकाने बँकेत पैसे काढायला जायचे आहे असे सांगून दुचाकीवरून नेले. तेथे त्यांना गळ्यातील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. ते दागिने काढत असताना दागिने त्याने जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्याला पकडण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले होते.
पथक चोरट्याचा शोध घेत असताना पथकातील अभिजित माळकर यांना ही चोरी कोल्हापूर येथील सराईत गुन्हेगार दस्तगीर शेख याने केली असून तो अंकलीत येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने अंकलीत सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ सोन्याची चेन सापडली. त्याबाबत चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून चेन, दुचाकी जप्त करण्यात आली. त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, संदीप पाटील, अतुल माने, प्रकाश पाटील, रणजीत जाधव, उदयसिंह माळी, अरुण पाटोल, अभिजीत माळकर, ऋषीकेश सदामते, संकेत कानडे, सुरज थोरात, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.