संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, 1 तारखेला बजेट सादर होणार
नवी दिल्ली : खरा पंचनामा
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची औपचारिक सुरुवात होणार आहे. त्यानंतर येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत सलग 9 वा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अधिवेशनाचा कालावधी 2 एप्रिलपर्यंत असणार आहे. पहिला टप्पा 13 फेब्रुवारी रोजी संपेल, तर दुसरा टप्पा 9 मार्चपासून सुरू होईल. 2 ते 4 फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत दोन्ही सभागृहांमध्ये शून्य प्रहर होणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्कामुळे निर्माण झालेला व्यापारविषयक तणाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, रशियाकडून तेल खरेदीबाबतची भूमिका, तसेच केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवर विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.
याशिवाय वायू प्रदूषण, मनरेगाच्या नावात करण्यात आलेले बदल, शेतीमालाचा हमीभाव, जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा, बेरोजगारी, मतचोरी आणि एकूण आर्थिक स्थिती या विषयांवरही सरकारला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.
विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीत 'व्हीबी-जी रामजी', एसआयआर आणि जी रामजी कायदा यासंदर्भात पुन्हा चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही मागणी फेटाळत संसदेत पारित झालेल्या कायद्यावर आता मागे जाणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले.
अधिवेशनाचा अजेंडा सादर न केल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यसभेतील खासदार जॉन ब्रिटास आणि जयराम रमेश यांनी या मुद्द्यावर आक्षेप नोंदवला. मात्र, किरेन रिजिजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि बजेटवरील चर्चेलाच प्राधान्य राहील, असे सांगत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.