"लिहिलेलं पुसता येतं पण, कोरलेलं नाही"
लातूर : खरा पंचनामा
महाराष्ट्रात २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने नुकतंच बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भाषण करत असताना रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या लातूरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर, रितेश देशमुखने सुद्धा यासंदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे.
"सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायची आहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, खरंतर आपल्या सर्वांचा उत्साह पाहिला तर लक्षात येतंय की, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात काही शंका नाही" असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं.
यावर तीव्र नाराजी व्यक्त करत अमित देशमुख म्हणतात, "भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या संदर्भात जे विधान केलंय, ते अत्यंत दुर्दैवी दुःखदायक आहे, त्यांच्याकडून आणि भारतीय जनता पक्षाकडूनही अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्हा सर्व लातूरकरांची मनं दुखावली आहेत. आम्ही त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत."
तसेच अभिनेता रितेश देशमुखने याबाबत व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. "दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं पण, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र"
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.