Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नगरपालिका निवडणुकीत राडा घालणारा मंत्रिपुत्र विकास गोगावले पोलिसांसमोर शरण

नगरपालिका निवडणुकीत राडा घालणारा मंत्रिपुत्र विकास गोगावले पोलिसांसमोर शरण

महाड : खरा पंचनामा

महाड नगरपालिका निवडणुकीत राडा घातल्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले याने आत्मसमर्पण केलं असून गोगावले यांना महाड शहर पोलिसांसमोर हजर करण्यात आले आहे. मागील दीड महिन्यांपासून विकास गोगावले फरार होते. काल न्यायालयाने विकास गोगावले यांना शरण येण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणात विकास गोगावले अनेक दिवस पसार होते. त्यांच्या अनुपस्थितीवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच विकास गोगावले यांनी आत्मसमर्पण केल्याचे समोर आले आहे.

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत 2 डिसेंबरला मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ झाला होता. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि गोंधळ झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुतणे महेश गोगावले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप आणि इतर काही कार्यकर्त्यांवर परस्परविरोधी तक्रारींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास गोगावले आणि महेश गोगावले दोघेही पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे हा मुद्दा थेट उच्च न्यायालयात गेला. मुंबई उच्च न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त करत, गुन्हा करूनही आरोपी मोकाट फिरत असतील आणि तरीही पोलिसांना ते सापडत नसतील तर हे गंभीर आहे, अशा आशयाची टिप्पणी केली होती. त्यानंतर आता विकास गोगावले पोलिसांसमोर हजर झाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.