विभागीय आयुक्तांसमोर नगरसेवक पदाची सही करावी लागणार, त्यानंतरच महापौर ठरणार
पुणे : खरा पंचननामा
महापालिकेतील गटांची नोंदणी करण्यासाठी पक्षप्रमुखांसह गटातील नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांसमोर उपस्थित राहून सही करावी लागणार आहे. त्यामुळे गटांची स्थापना जरी झाली तरी विभागीय आयुक्तांनी कळवल्या जाणाऱ्या तारखेला संबंधित नगरसेवकांना पुण्यात उपस्थित राहावे लागणार आहे.
त्यानंतरच महापौर निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ होण्याची चिन्हे आहेत. ३० जानेवारीला महापौर निवडीची सभा घेण्याचा प्रयत्न आहे.
महापालिकांमध्ये आलेल्या नूतन नगरसेवकांना गटनोंदणी करण्याचे पत्र विभागीय आयुक्तांकडून महापालिकेला आले आहे. त्यानुसार पक्षांनी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यात गटनेत्याची निवड करायची आहे. त्यानंतर प्रतिज्ञापत्रासह आवश्यक कागदपत्रे माहिती विभागीय आयुक्तांकडे सादर करावी लागणार आहे. ही माहिती केवळ टपालाने वा कुणी एकट्याने विभागीय आयुक्तांकडे द्यायची नाही.
गटाची सर्व कागदपत्रांची तयारी झाल्यानंतर विभागीय आयुक्तांसमोर जाण्याची तारीख निश्चित होईल. त्याप्रमाणे ठरलेल्या तारखेला पक्षप्रमुखांसह त्या गटातील सदस्यांनी पुण्याला जाऊन विभागीय आयुक्तांसमोर नमुना चारच्या नोंदवहीवर स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट, जनसुराज्यशक्ती पक्षाच्या नगरसेवकांना गटनोंदणीसाठी पुण्याला जावे लागणार आहे. सर्वांची नोंदणी झाल्यानंतर विभागीय आयुक्तांकडून महापौर निवडीची तारीख निश्चित केली जाईल. त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रक्रिया राबवायची आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून महापौर निवडीची सभा ३० जानेवारीला घेण्याचे नियोजन दिसत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.