EVM ला जोडलं जाणारं 'पाडू' मशीन काय आहे?
राज ठाकरेंसह विरोधकांचा त्यावर आक्षेप का?
मुंबई : खरा पंचनामा
१५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिकांमध्ये होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तत्पूर्वी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आदल्या दिवशीपर्यंत घरोघरी जाऊन माईक आणि पत्रकांचा वापर न करता प्रचार करता येणार असल्याचे म्हटल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
तसेच यंदा ईव्हीएमला पाडू नामक मशीन नव्याने जोडले जाणार आहे. या मशीनवरही आता राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. या मशीनची माहिती आधीच का देण्यात आली नाही, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदार यादी, मतदान केंद्रांची व्यवस्था आणि २३ मतमोजणी केंद्रांची माहिती आणि मतमोजणी प्रक्रियेत पाडू या नवीन मशीनचा वापर याबाबत माहिती दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीदरम्यान बॅकअप म्हणून पाडू या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. यावर आता शिवसेना (ठाकरे), आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात (EVM) नियंत्रण युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणी दर्शविण्यासाठी मतमोजणी दरम्यान PADU मशीन वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. मतमोजणी प्रक्रियेत व्यत्यय येऊ नये म्हणून हे मशीन केवळ आकस्मिक उपाय म्हणून काम करेल, असेही महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
पाडू (Printing Auxiliary Display Unit) मशीनद्वारे मतदान यंत्रातील डेटा वाचता येऊ शकतो. प्रथमच ही यंत्रणा वापरण्यात येणार असून अशा १४० यंत्रांची तरतूद करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेंगलुरू या कंपनीची मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. या मतदान यंत्रांद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक आहे.
जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनही मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल तर याच कंपनीने विकसित केलेल्या 'पाडू'चा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १४० 'पाडू' यंत्रे मुंबई महापालिकेला अतिरिक्त म्हणून प्राप्त झाल्याची माहिती भूषण गगराणी यांनी दिली.
राज ठाकरेंनी या मशीनवर आक्षेप घेतला आहे. "या मशीनची कोणत्याही राजकीय पक्षाला माहिती दिलेली नाही. ते मशीन आम्हाला दाखवले गेलेले नाही. उद्धव ठाकरेंच्या नावाने आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल पत्र लिहिले आहे. हे मशीन राजकीय पक्षांना का दाखवले गेले नाही, हे मशीन काय आहे? राजकीय पक्षांना याची माहिती द्यावीशीही त्यांना वाटत नाही. निवडणूक आयुक्त वाघमारे यावर उत्तर द्यायला तयार नाहीत. अर्थात आताच्या सरकारने वाघ कधीच मारून टाकला आहे",
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.