आठ पोलीस निलंबित, दोन बडतर्फ तर २२ जणांचे निलंबन कायम !
त्रैमासिक निलंबन पुनर्विलोकन बैठकीत निर्णय
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई पोलीस दलात यापुढे कामचुकारपणा करणाऱ्या पोलिसांविरुद्ध तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची कठोर भूमिका पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी स्वीकारली आहे. अलीकडेच झालेल्या निलंबन आढावा समितीच्या बैठकीत आठ पोलिसांना निलंबित करण्यात आले तर दोघांना बडतर्फ व २३ जणांचे निलंबन कायम ठेवण्यात आले.
बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविलेली असतानाही ती टाळणे यापुढे पोलिसांना महागात पडणार आहे. अशी हयगय करणाऱ्यांसोबतच, वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन, कारण न देता दीर्घकाळ गैरहजेर राहणे तसेच शिस्तभंग आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलिसांची गय केली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. अशा आठ पोलिसांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले तर दोघांना राज्य घटनेच्या ३११ कलमान्वये सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
याशिवाय २३ पोलिसांच्या निलंबन कारवाईचाही समितीने आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्या कार्यपद्धती तसेच त्यांच्यावरील निलंबनाचा कारवाई योग्य वाटल्याने निलंबन कायम ठेवण्यात आले. यापैकी काही जणांनी दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत या २३ जणांचे निलंबन कायम ठेवण्यात आले. पोलिस आयुक्तांच्य अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निलंबन आढावा समितीने हा निर्णय घेतला.
पोलिस दलात शिस्त, कार्यक्षमता तसेच जनतेच्या विश्वासाला धक्का देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आयुक्तांनी ठरविले आहे. ३० जानेवारी रोजी झालेल्या त्रैमासिक निलंबन पुनर्विलोकन बैठकीत हे निलंबन, बडतर्फीचे निर्णय घेण्यात आले. या कारवाईमुळे पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे. प्रत्येक प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर संबंधित पोलिसांविरुद्ध असलेल्या प्रकरणांचे स्वरूप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने निलंबन पुढेही कायम ठेवण्याचा निर्णय निलंबन आढावा समितीने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी वांद्रे वाहतूक विभागातील हवालदार शरद शिंदे आणि शंकर जठर यांचे निलंबन मागे घेण्यात आले. मात्र शिस्तभंग कारवाईच्या अधीन राहून त्यांना सेवेत परत घेण्यात आले असले तरी त्यांची नियुक्ती कमी महत्त्वाच्या नायगाव येथील सशस्त्र पोलिस दलात करण्यात आली.
भांडुप पोलिस ठाण्याचे हवालदार जितेंद्र खरात ३१ डिसेंबर २०२४ पासून वर्षभराहून अधिक काळ कामावर गैरहजर राहिल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. याशिवाय शंकरकुमार रूपनर (मुलुंड) हेदेखील कामावर दीर्घकाळ गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नारायण आळंद (आझाद मैदान) यांच्यावर चर्चगेट सबवे परिसरात बेकायदा फेरीवाल्यांशी संगनमत करुन कारवाई न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पोलिस शिपाई रामेश्वर गुलनाड (ताडदेव), शिवाजी बलमे (वरळी), तुषार तिवूरवाडे (आग्रीपाडा), रेखा बुरूड (नवघर), पोलिस नाईक वसंत भुरा (विमानतळ) यांनाही निलंबित करण्यात आले. एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सुनील देसाई आणि विक्रम शेंडगे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.