दोन लाखांची लाच घेताना लष्करी अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले; 'सीबीआय' ची कारवाई
पुणे : खरा पंचनामा
खडकीमधील लष्करी अभियांत्रिकी सेवा कार्यालय (मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एमईएस) येथील दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीबीआय) दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या गुन्ह्याची नोंद खडकी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सुनील निकम आणि सुरेश म्हस्के ही अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. म्हस्के हा कनिष्ठ अभियंता तर निकम हा असिस्टंट गॅरिसन इंजिनिअर आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरांच्या झडतीतही लाखो रुपयांची माया हाती लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
'एमइएस' तर्फे शहर व जिल्ह्यातील छावणी क्षेत्रातील बांधकामे आणि देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. निकम व म्हस्के या दोघांकडे कंत्राटदारांच्या बिलांची मंजुरी देण्याचे काम आहे. त्यांनी एका ठेकेदारकडे बिलाच्या मंजुरीसाठी सहा लाख रुपये मागितले होते. त्यासाठी ते त्याला तगादा लावत होते. यासंदर्भात संबंधित ठेकेदाराने सीबीआय कडे तक्रार केली होती.
या तक्रारीची पडताळणी अनेक दिवस सुरु होती. त्यामध्ये तथ्य आढळल्यानंतर सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी 'एमईएस'मध्ये सापळा रचून म्हस्केला लाच घेताना रंगेहाथ पकडले. यामध्ये निकमचा सहभाग आढळल्याने त्यालाही अटक करण्यात आली.
त्यांच्या घरांवरही सीबीआयने छापे टाकले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड व महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संरक्षण विभागाच्या बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.