Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पायलटने मुद्दाम इंजिनचा इंधन पुरवठा बंद केला? अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताबाबत खळबळजनक खुलासा

पायलटने मुद्दाम इंजिनचा इंधन पुरवठा बंद केला? 
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताबाबत खळबळजनक खुलासा

दिल्ली : खरा पंचनामा

जून २०२५ मध्ये अहमदाबाद विमानतळावर झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. इटालियन वृत्तपत्र 'कॉरिअर डेला सेरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नाही, तर जाणूनबुजून केलेल्या कृत्यामुळे झाला असल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला आहे. ही बातमी समोर येताच खळबळ उडाली आहे.

तपासाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाचा इंधन पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला नव्हता, तर तो मॅन्युअली म्हणजेच हाताने बंद करण्यात आला होता. त्यामुळेच हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच हे कृत्य करण्यात आलं. ज्यामुळे विमानाचं इंजिन बंद पडलं आणि विमान खाली कोसळल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

या भीषण अपघातात प्रवासी आणि ज्या वैद्यकीय वसतिगृहावर विमान पडले त्यातील विद्यार्थी मिळून एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता. जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक अहवालात कॉकपिटमधील शेवटच्या संवादाचा उल्लेख करण्यात आला होता. ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंगनुसार, एक पायलट विचारत होता, "तू इंधन पुरवठा का बंद केलास?" त्यावर दुसऱ्याने उत्तर दिलं होतं की, "मी असं काही केलं नाही." या संवादावरून तपास यंत्रणांचा संशय अधिक बळावला आहे.

या प्रकरणात मुख्य संशय कॅप्टन समीर सभरवाल यांच्यावर जात आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, कॅप्टन सभरवाल हे नैराश्याने ग्रस्त होते. मात्र, कॅप्टन सभरवाल यांच्या वडिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मुलाला मानसिक आजार किंवा घटस्फोटासारख्या वैयक्तिक समस्यांमुळे तणावात नव्हता, असा दावा त्यांनी केला असून नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.