आग्र्यातील मुघल म्युझियमचे नाव आता 'छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम'
आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीचे आयोजन
आग्रा : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर खास पोस्ट करून छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली आहे. तत्पूर्वी त्यांनी टिपू सुलतानशी निगडीत वादावर मोठी विधाने केली आहेत. 'विकसित भारत समृद्ध यूपी' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवरायांची तुलना आक्रमणकांशी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत आणि 'हिंदवी स्वराज्या'चे संस्थापक आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ज्यांनी भारताचा आत्मा आणि श्रद्धेला ठेच पोहोचवली, अशा कोणत्याही आक्रमकाशी शिवरायांची तुलना होऊ शकत नाही. "टिपू सुलतानला भारतीय समाज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू शकत नाही," असे सांगत त्यांनी टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.
योगी सरकारने आग्र्यातील मुघल म्युझियमचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम' केले आहे. आज १९ फेब्रुवारी रोजी आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीचा भव्य कार्यक्रम उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने साजरा केला जात आहे. शिवरायांचा त्याग, पराक्रम आणि स्वाभिमान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
'वंदे मातरम'च्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री योगी यांनी अखिलेश यादव यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले की, "वंदे मातरम हा केवळ मंत्र नसून या देशाचा आत्मा आहे. त्याचा अपमान करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे." अखिलेश यादव यांच्या समर्थकांकडून वंदे मातरमचा अनादर होत असल्याच्या प्रश्नावर योगींनी सल्ला दिला की, "अखिलेशजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला हवे. तिथे गेले तर त्यांना शिस्त समजेल आणि दुपारी १२ वाजता उठण्याऐवजी पहाटे लवकर उठण्याची चांगली सवय लागेल."
१९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवरायांनी विजापूरची आदिलशाही आणि मुघलांना धूळ चारली. त्यांना 'भारतीय नौसेनेचे जनक' मानले जाते. योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिवरायांना अभिवादन केले आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीची गाथा युगानुयुगे देशाला प्रेरणा देत राहील, असे नमूद केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.